लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ई-फायलिंग व पॅनकार्डचा डेटा हॅक करून त्याआधारे प्राप्तिकर विभागातून पतीच्या उत्पन्नाची माहिती परस्पर मिळविल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात पत्नी व तिच्या भावाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायधीश एस. एम. मेनजोगे यांनी हा आदेश दिला. पूजा संकेत चरखा, मेव्हणा पियुष रमेश मालाणी (रा. भिवंडी) अशी अटकपूर्व जामीन फेटाळल्यांची नावे आहेत. वारजे पोलीस ठाण्यात दोघांवर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संकेत लक्ष्मीनारायण चरखा (वय २८, रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे) यांनी तक्रार दिली आहे. संकेत चरखा एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात एमबीए विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. गेल्या वर्षी २३ एप्रिलला त्यांचा पूजा हिच्याशी विवाह झाला. मात्र, काही दिवसांतच आईवडिलांशी वेगळे राहण्याचा तिने तगादा लावला. सीएची पुस्तके आणायला जाते, असे सांगून ती भिवंडीला निघून गेली, आणि भिवंडीच्या शहर पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत तिने फिर्यादीविरूद्ध गुन्हा दाखल केला. तिने पोटगीसाठी न्यायालयात अर्जही दाखल केला. या फसवणुकीबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पूजा चरखा व पियुष मालाणी यांनी शिवाजीनगर न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी जामीन अर्जास विरोध केला. या गुन्ह्यात आरोपींकडे तपासाची आवश्यकता आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली. ती न्यायालयाने मान्य केली.केस चालू असतानाच न्यायालयात आयकर विभागाचे पुरावे म्हणून फिर्यादीचा फॉर्म २६ ए.एस दाखल करण्यात आला. फिर्यादीच्या परवानगीशिवाय टीडीएस व उत्पनाचे पुरावे इंटरनेटवरून मिळविण्यात आले. मार्च१७ मध्ये इन्कमटॅक्स रिटर्न फाईल करताना आयकर विभागाच्या ई- फायलिंग संकेतस्थळावर अन्य दुसऱ्या व्यक्तीने रजिस्टर ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाकल्याचे फिर्यादीला कळले. अधिक माहिती घेतली असता फिर्यादीचा ई-फायलिंग व पॅन डेटा हॅक करून पत्नी आणि मेव्हण्याचे कागदपत्रे मिळवून फसवणूक केल्याचे आढळले.
पत्नी व मेव्हण्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: July 11, 2017 1:06 AM