मुंबई : देशाची सेंट्रल बँक स्वत:च्या सुरक्षेसाठी जर काही पावले उचलत असेल, तर ती जनहितासाठी आहेत, असे म्हणत उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने (आरबीआय) कार्यालयाच्या इमारतीचे आणि आवाराचे फोटो काढण्यास घातलेली बंदी योग्य ठरवत, याविरुद्ध दाखल केलेली जनहित याचिका फेटाळली. आरबीआयने कार्यालयाच्या इमारतीचे आणि आवाराचे फोटो घेण्यास बंदी घातली आहे. या बंदीला आव्हान देणारी जनहित याचिका अरुल सेलवान यांनी केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.आरबीआयला कार्यालयाच्या इमारतीचे आणि आवाराचे फोटो काढण्यास प्रतिबंध करण्याचा कायद्यानुसार अधिकार नाही, असा युक्तिवाद सेलवान यांनी केला. त्यावर खंडपीठाने सेलवान यांनाच धारेवर धरले. ‘आरबीआयने तुम्हाला पत्र लिहून कळवले आहे की, ही बंदी सुरक्षेच्या कारण्यास्तव घालण्यात आली आहे. तरीही तुम्ही जनहित याचिका दाखल करता? उद्या तुम्ही लोकसभेचे फोटो काढू द्या, असे म्हणाल. देशाच्या सेंट्रल बँकेच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. आरबीआय सुरक्षेसाठी काही पावले उचलत असेल, तर त्यांना अधिकार नाही, असे कसे म्हणता येईल. तुम्ही दाखल केलेली याचिका जनहितासाठी नसून, जनहिताविरुद्ध आहे,’ असे म्हणत खंडपीठाने सेलवान यांची याचिका फेटाळली. (प्रतिनिधी)
आरबीआयचे फोटो काढण्यास नकारच
By admin | Published: June 28, 2016 4:10 AM