अकोला: रविवारी राखी पौर्णिमेच्या दिवशी भरदुपारी सूर्याभोवती नैसर्गिक आभामंडल तयार झालं. जवळपास अर्धा तास स्पष्ट दिसलेल्या या गोलाकार खळय़ाला त्याच कालावधीत एका जेट विमानाने छेद दिला. त्यावेळी आकाशात निर्माण झालेल्या अनोख्या कलाकृतीमुळे जणू सूर्यनारायणासोबत धरणीमातेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आरंभला की काय, असा आभास निर्माण झाला होता. रविवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घडलेल्या या खगोलीय घटनेची माहिती व दृष्ये अनेकांनी भराभर एसएमएस, व्हॉट्सअँप, फेसबुक अशा विविध माध्यमांद्वारे एकमेकांना कळविली व हा हा म्हणता संपूर्ण राज्यातील खगोलप्रेमींनी निसर्गाचे हे अनोखे दृश्य नजरेत कैद केले. याच कालावधीत आभामंडलातून गेलेल्या एका जेट विमानाच्या धुरामुळे एक रेषा निर्माण झाली होती. रक्षाबंधनाची सर्वत्र लगबग सुरू असताना, आकाशात निर्माण झालेल्या या नैसर्गिक कलाकृतीमुळे जणू सूर्यनारायणासोबत धरणीमातेने रक्षाबंधनाचा कार्यक्रम आरंभला की काय, असा भास निर्माण झाला होता.या घटनेमागील शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी ह्यलोकमतह्णने येथील खगोल तज्ज्ञ नितीन ओक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, वर्षा ऋतूमध्ये पृथ्वीच्या वातावरणात आर्द्रता निर्माण होत असते. श्रावण मास सुरू असल्याने सर्वत्र ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून उघाड असल्यामुळे, सूर्याच्या पडणार्या प्रखर किरणांमुळे पृथ्वीच्या वातावरणात भरपूर प्रमाणात आर्द्रता निर्माण झाली. सूर्याच्या तुलनेत चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे चंद्राभोवती निर्माण होणारे लहानसे खळे आपण अनेकदा बघतो, अनुभवतो. त्यातलाच हा प्रकार आहे. सूर्य हा पृथ्वीपासून कोसो दूर आहे. आद्र्रतेमुळे पृथ्वीच्या वातावरणात निर्माण झालेल्या पाण्याच्या कणांवर सूर्यप्रकाश पडल्यामुळे ते प्रकाशमान होतात. याच कारणामुळे रविवारी सूर्याभोवती आभामंडल दिसून आलं आणि गंमत अशी की, ज्या कालावधीत हे आभामंडल दिसलं, त्याच कालावधीत एका जेट विमानाने या आभामंडलास पूर्ण छेद दिला. केवळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात हे दृष्य खगोलप्रेमींना दिसून आले.
आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे..
By admin | Published: August 11, 2014 1:07 AM