लोकमत न्यूज नेटवर्क, बारामती: ‘शरद पवार साहेब आणि बारामतीकरांचे सहा दशकांचे प्रेमाचे ऋणानुबंध आहेत. त्यासाठी कोणतीही योजना नाही. नाती १५०० रुपयांनी जोडली जात नाहीत. ती मनाने जोडली जातात. मला विचाराल, तर तो नात्यांचा अपमान आहे. ज्यांना नातीच कळाली नाहीत, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला.
शरद पवार गटातर्फे आयोजित शिवस्वराज्य यात्रेच्या महावीर भवन येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, ‘लोकसभा निवडणुकीवेळी आपल्या हातात कोणतीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा कोणतेही सत्ताकेंद्र नव्हते; पण मायबाप जनता सोबत असल्यामुळे आपण विजयी होऊ शकलो.’
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पवार साहेबांना शहाण्या माणसाने डिवचू नये. एकदा जागं केलं आणि आव्हान दिलं की पवार साहेब ते तडीस नेल्याशिवाय राहत नाहीत.
बहिणींचे आशीर्वाद माझे रक्षण करील : अजित पवार
लोकमत न्यूज नेटवर्क, धुळे: बहिणींचे आशीर्वादच माझे रक्षण करील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. अजित पवार गटाच्या वतीने काढण्यात आलेली जनसन्मान यात्रा धुळ्यात पोहोचली. यावेळी आयोजित महिला मेळाव्यात अजित पवार म्हणाले, की सर्वांगीण विकास करत असताना लाडकी बहीण योजना प्रभावीपणे आपण राबविणार आहोत. रक्षाबंधनापूर्वी बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होतील, पॉवरलुमसाठी सोलर पॅनल उभारण्यात येईल. मुलींच्या उच्च शिक्षणाचा खर्च देखील आता राज्य शासन उचलणार आहे.