लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्य शासन शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याचा विचार करत आहे, पण यासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांची घातलेली अट शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केले. केंद्र शासनाच्या तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह आरपीआयचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, की कर्जमाफीसाठी सध्या राज्यात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, ही आरपीआय आणि भाजपा दोघांची भूमिका आहे. परंतु त्यासाठी ३० ते ४० हजार कोटी रुपये आणायचे कोठून, हा मोठा प्रश्न आहे. भाजपा सरकार दलितांचे आरक्षण रद्द करणार आहे, संविधान बदलणार असा खोडसाळ प्रचार काही मंडळी करत असल्याचे सांगून आठवले म्हणाले, ‘‘देशाचे पंतप्रधान संविधानाला धर्मगं्रथ मानत असून, ते बदलले जाणार नाही आणि आरक्षणालाही कोणताच धोका नाही. पाकिस्तानकडून सातत्याने सीमेवर हल्ले केले जात आहेत. त्यांना जास्त खुमखुमी असेल तर त्यांना धडा शिकवावा लागेल. एकदाच आरपारची लढाई होऊन जाऊ द्या. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे अशी मागणी करतानाच आमचे धोरण युद्धाकडे नाही तर बुद्धाकडे जाणारे आहे. मात्र वेळ आली तर चोख उत्तर देण्यात येईल.’’मराठी माणूस राष्ट्रपती झाला तर आम्हाला आनंदच वाटेल. शरद पवार यांना राष्ट्रपती व्हायचे असेल तर विरोधात राहून ते शक्य नाही. त्यांनी एनडीएमध्ये यावे, अजून आमचा उमेदवार ठरलेला नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले.
अल्पभूधारकांची अट शिथिल करा - रामदास आठवले
By admin | Published: June 12, 2017 1:42 AM