पुणे : परराष्ट्र धोरण हे आपल्या सगळ्यांच्या विचारांवर उभे राहत असते. ज्या लोकांना वाटते की, परराष्ट्र धोरण आमच्यासाठी नाही, त्यांच्यासाठी भारताचा विचार काय आहे, भूमिका काय आहे, हे समजण्यासाठी ‘भारत मार्ग’ हे पुस्तक महत्त्वाचे असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विचार साधना पुणे आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने शनिवारी आयोजित परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर लिखित ‘द इंडिया वे : स्ट्रॅटेजीस फॉर ॲन अनसर्टेन वर्ल्ड’ या मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘भारत मार्ग : जगातील अनिश्चितता आणि भारताची रणनीती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी पुस्तकाचे लेखक परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, विजय चौथाईवाले, भारतीय विचार साधनाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राजीव सहस्रबुद्धे उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, आजच्या परिस्थितीत मजबूत देश म्हणून भारत पुढे येत असताना पंतप्रधानांसोबत आपली क्षमता पणाला लावणाऱ्या डॉ. एस. जयशंकर यांचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणे ही पर्वणी होय.
‘भारत मार्ग’ उपयुक्त विचारपरराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, जागतिकीकरण ही आजची वास्तविकता असेल तर त्याचे दुष्परिणाम कमी करण्यासोबत त्यातील संधींचाही विचार करावा लागेल. ‘भारत मार्ग’ जगाच्या आजच्या परिस्थितीत इतरांसाठी उपयुक्त असणारा विचार आहे. या मार्गावर पुढे गेल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकेल.