मुंबई : लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील चेरा गावात रस्त्यावर फिरून पेप्सीगोळा विकणा-या तुकाराम या विक्रेत्याचे पेप्सीगोळा फुकट दिला नाही म्हणून त्याच गावातील बालाजी किसन नगरवाड या इसमान तुकारामची केलेली हत्या हे वेडाच्या भरात केलेले कृत्य होते, असा निष्कर्ष काढून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बालाजीची निर्दोष मुक्तता केली.६ जून २०१२ रोजीच्या घटनेतून दाखल खटल्यात जिल्हा सत्र न्यायालयाने बालाजीला खुनाच्या गुन्ह्याबद्दल दोषी ठरवून जन्मठेप दिली होती. त्याविरुद्ध बालाजीने केलेले अपील मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठाने उपरोक्त निकाल दिला.तुकारामची हत्या बालाजीनेच केली हे पुराव्यानिशी सिद्ध झाले असले तरी ती हत्या त्याने वेडाच्या भरात केली असावी, अशी दाट शक्यता दिसत असल्याने भादंवि कलम ८४ नुसार हा खून ठरत नाही. त्यामुळे बालाजी खुनातून निर्दोष सुटला असला तरी कायद्याच्या दृष्टाने तो वेडा ठरत असल्याने त्याला समाजात मोकळे सोडणे हिताचे होणार नाही. त्यामुळे सध्या औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात असलेल्या बालाजीला येरवडा मनोरुग्णालयात दाखल करून तेथे त्याच्यावर योग्य ते उपचार केले जावेत, असा आदेश खंडपीठाने दिला.विशेष म्हणजे सत्र न्यायालयात किंवा अपिलातही आरोपीच्या वकिलाने त्याने ही हत्या वेडाच्या भरात केल्याचा बचावाचा मुद्दा अजिबात मांडला नव्हता. उलट अपिलात तर त्याच्या वकिलाने बालाजीकडून तुकारामची हत्या झाली असली तरी त्याला ठार मारण्याचा त्याचा हेतू नव्हता. परिणामी त्यास सदोष मनुष्यवधाबद्दल दोषी ठरवावे, अशी विनंती केली होती. बालाजी वेडा नसल्याचा निर्वाळा येरवड्यातील डॉक्टरांनी आधी दिला होता, हेही लक्षणीय आहे. मात्र खंडपीठाने खंडपीठाने सर्व साक्षीपुराव्यांची बाकराईने छाननी करून असे नमूद केले की, एरवी फौजदारी खटल्यात आरोपीवरील गुन्हे सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी अभियोग पक्षावर असते व यासाठी नि:संशय पुरावे हा निकष असतो.मात्र जेव्हा आरोपीने वेडाच्या भरात गुन्हा केल्याचा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा ते सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर येते. तरीही ज्यातून तशी प्रबळ शक्यता दिसून येऊन न्यायालयाच्या मनात संशय निर्माण होईल, एवढा पुरावा त्यासाठी पुरेसा ठरतो. प्रस्तुत प्रकरणात तशी प्रबळ शक्यता वाटावी, अशी परिस्थिती दिसते.का ठरला बालाजी वेडा?बालाजीने तुकारामची हत्या केली तेव्हा त्याचे मन ताळयावर नव्हते असा निष्कर्ष काढताना खंडपीठाने पुढील बाबी विचारात घेतल्या:एक रुपयांचा पेप्सीगोळा फुकट न देण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून बालाजीने तुकारामच्या डोक्यात दगड घातला.हे घडत असताना तेथे असलेल्या बघ्यांपैकी कोणीही मध्ये पडण्यास धजावले नाही.भावास बोलावल्यावर त्याने बालाजीला जमिनीवर आडवे पाडून त्याचे हात-पाय बांधले तेव्हा कुठे तो आटोक्यात आला.रिमांडसाठी दंडाधिकाºयांपुढे उभे केले तेव्हा बालाजीच्या वेडाचा उल्लेख झाला होता व दंडाधिकाºयांनी त्यासा तपासणीसाठी लातूर जिल्हा रुग्णालयात पाठविले होते.बालाजीने बचावासाठी काहीच केले नाही. त्याला सरकारकडून वकील दिला गेला.खटल्यात काही साक्षीदारांनी बालाजीच्या वेड्यासारख्या वागण्याचे दाखले दिले होते.खटला सुरु असताना किंवा शिक्षा झाल्यावरही बालाजीला भेटायला त्याचा कोणीही नातेवाईक फिरकलाही नाही.खटला सुरु असताना किंवा शिक्षा झाल्यावरही बालाजीला भेटायला त्याचा कोणीही नातेवाईक फिरकलाही नाही.
पेप्सीगोळा फुकट न दिल्याने खून करणाऱ्याची जन्मठेप रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:58 AM