यवतमाळ : बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरील टपाल तिकिटाचे लोकार्पण रविवारी ११ मे रोजी यवतमाळात आयोजित समता पर्वात थाटात करण्यात आले. फुले दाम्पत्यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील योगदानाची दखल घेऊन भारत सरकारच्या केंद्रीय टपाल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या या डाक तिकिटाचे लोकार्पण समता मैदानावर आयोजित महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्वात भरगच्च उपस्थितीत करण्यात आले. या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात फुले दाम्पत्यांना चळवळीतील कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. महात्मा फुले यांना ११ मे १८८८ रोजी महात्मा ही पदवी देण्यात आली होती. या दिनाचे औचित्य साधून भारत सरकारतर्फे हे डाक तिकीट काढण्यात आले आहे. या वेळी इंडियन फेलेटिकल ब्युरोचे सदस्य डॉ. चंद्रभान भोयर, बी.के. गिरी, ज्ञानेश्वर गोबरे, प्रा. अशोक वानखडे, दत्ता चांदोरे आदींसह समता पर्वा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते. ११ मे १८८८ला जोतिराव फुले यांना मुंबई येथील कोळी वाड्यात आयोजित समारंभात जनतेच्या वतीने ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली होती. त्याच दरम्यान महात्मा जोतिराव फुले यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती दिली होती. याच दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारच्या फेलेटिकल ब्युरोने माय स्टॅम्प योजनेअंतर्गत फुले दाम्पत्यांचे डाक तिकीट काढण्याचा निर्णय घेतला आहे. समता पर्वाच्या निमित्ताने या डाक तिकिटाचे विमोचन करून फुले दाम्पत्याच्या क्रांतीकार्याला अनोखे अभिवादन करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
फुले दाम्पत्यावरील डाक तिकिटाचे लोकार्पण
By admin | Published: May 13, 2014 4:05 AM