मुंबई : ब्रिटनवरून सोमवारी रात्रीपासून तीन विमाने मुंबईत दाखल झाली आहेत. या विमानांतून ५९० प्रवासी आले आहेत. यापैकी १८७ मुंबईतील असून १६७ राज्याच्या अन्य भागातील आहेत. तर १६७ प्रवाशी महाराष्ट्रबाहेरील आहेत. या प्रवाशांना त्यांच्या घरी जाऊ दिल्याने वाद निर्माण झाला आहे.
राज्याबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्या त्या राज्यातील प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशांना सोडल्यामुळे हॉटेलमध्ये विलगीकरणात असलेल्या काही प्रवाशांनी मंगळवारी हॉटेलमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करीत ठिय्या मांडला.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी सांगितल्यानुसार ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना फाईव्हस्टार व परवडणाऱ्या हॉटेलमध्ये ७ दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन केले जाणार होते. तसेच ५ ते ७ दिवसांनंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार होती. याचा संपूर्ण खर्च या प्रवाशांनाच करावा लागणार होता. फक्त हॉटेल निवडण्याची मुभा देण्यात येणार होती. याबाबतची गाईडलाईनही पालिकेने प्रसिद्ध केली होती. मात्र, आता राज्याबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच राज्यातील प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. यामुळे दुजाभाव होत असल्याने हे प्रवासी नाराज झाले आहेत.
काय म्हणते गाईडलाईन....
मुंबई महापालिकेने राज्यातील इतर विभागांवर जबाबदारी न टाकता लंडनहून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईतच क्वारंटाईन करण्याची सोय केली आहे. या प्रवाशांसाठी फाईव्हस्टार हॉटेल बुक करण्यात आली असून या हॉटेलचा खर्च या प्रवाशांनाच करायचा आहे. तसेच त्यांना विमानतळावर उतरल्य़ावर पसंतीनुसार हॉटेल निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर हे प्रवासी आल्या आल्या त्यांची कोणतीही कोरोना टेस्ट केली जाणार नाही. तर ५ ते ७ दिवसांनी हॉटेलमध्येच त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टचा खर्चही या प्रवाशांनीच करायचा आहे.
या आरटी-पीसीआर टेस्टमध्ये प्रवासी पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसल्यास आणखी ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशाप्रकारे १४ दिवसांचे हॉटेलचे बिल या प्रवाशाला भरावे लागणार आहे. तसेच जर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तर त्याला घरी सक्तीचे क्वारंटाईन केले जाणार आहे. जर प्रवाशामध्ये विमानतळावर आल्यावर कोरोनाची लक्षणे दिसली तर त्याला थेट सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे.
क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी एक हजार खोल्या पंचतारांकित आणि फोर स्टार हाॅटेलमधील तर एक हजार खोल्या बजेट हाॅटेल्समधील असणार आहेत. तसेच बुधवारपासून युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना महापालिकेच्या केंद्रांमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.