मुंबई : रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) आणि एअरसेल या दोन कंपन्यांनी यापुढे भारतात मोबाईल सेवा पुरविण्याचा व्यवसाय एकत्रितपणे करण्याचे जाहीर केले आहे. या भागिदारीत दोन्ही कंपन्यांचा समान वाटा असेल व त्यांच्या एकत्र येण्याने ग्राहकसंख्येच्या दृष्टीने देशातील ही चौथ्या क्रमांकाची मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी ठरणार आहे.आरकॉम आणि एअरसेलची प्रवर्तक असलेली मलेशियाची मॅक्सिस कम्युनिकेशन्स बेऱ्हार्ड या दोन कंपन्यांमध्ये यासाठीचे करारमदार सोमवारी झाले. आरकॉमच्या संचालक मंडळाने बुधवारी औपचारिक मंजुरी दिल्यावर या भागिदारीची औपेचारिक घोषणा करण्यात आली. भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील ही सर्वात महत्वाची घटना मानली जात आहे. रिलायन्स जिओच्या आगमनानंतर या क्षेत्रात बरीच उलथापालथ अपेक्षित होती. बरेच दिवस चर्चेत असलेली ही भागिदारी त्याचाच एक भाग आहे.या दोन्ही भागिदारांकडे मिळून ८५०, ९००, १८०० आणि २१०० मेगाहर्स्ट््स बॅण्डचा एकूण ४४८ मेगाहर्स्ट््स एवढा स्पेक्ट्रम उपलब्ध असेल. त्यांची स्पेक्ट्रमची ही पुंजी देशातील मोबाईल कंपन्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची असेल. त्यांची एकत्रित मालमत्ता ६५ हजार कोटी रुपयांची असेल. त्यांची एकत्रित सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात सर्व २२ परिमंडळांत उपलब्ध असेल.याखेरीज आरकॉमच्या आधी झालेल्या स्वतंत्र करारामुळे या एकित्रत भागिदारीच्या ग्राहकांना रिलायन्स जिओची नव्याने सुरु झालेली ४-जी सेवाही उपलब्ध होईल.दोन्ही कंपन्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार या भागिदारीमुळे सन २०१७च्या अखेरीस आरकॉमचा कर्जाचा बोजा २० हजार कोटींनी तर एअरसेलचा कर्जाचा बोजा चार हजार कोटी रुपयांनी कमी होईल. दोघांचे मिळून नक्त मूल्य ३५ हजार कोटी रुपये असेल. भारतीय दूरसंचार क्षेत्रातील हे सर्वात मोठे विलिनिकरण मानले जात आहे.ही भागिदारी फक्त वायरलेस व्यवसायापुरती आहे. आरकॉमचा डेटा सेंटर, आॅप्टिक फायबर, दूरसंचार पायाभूत यंत्रणा इत्यादी व्यवसाय स्वतंत्रपणे सुरु राहील. (प्रतिनिधी)आधी एसएसटीएल (सिस्टेमा/ एमटीएस) विकत घेऊन व आता एमसीबीसोबत ५०:५० भागिदारी करून भारतीय दूरसंचार क्षेत्राला बळकटी देता आल्याने आम्हाला आनंद होत आहे.-अनिल अंबानी, अध्यक्ष, आरकॉमही भागिदारी करून एमसीबीने भारताशी पुन्हा एकदा बांधिलकी दाखवली आहे. २००६ मध्ये एअरसेल ताब्यात घेतल्यापासून आम्ही भारतात केलेली ३५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक ही केवळ दूरसंचारच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील सर्वात मोठी परकीय गुंतवणूक आहे.-मॅक्सिस कम्यु, बेऱ्हार्ड कंपनीचे निवेदन
रिलायन्स, एअरसेलची भागीदारी
By admin | Published: September 15, 2016 3:40 AM