जमिनीच्या वादातून पोलीस ठाण्यातच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गोळ्या झाडणारे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. गायकवाड यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. २ फेब्रुवारीला उल्हासनगरमधील पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता.
आज त्यांना उल्हासनगर चोपडा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने पाचही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. याप्रकरणी आमदार गायकवाड, त्यांचा चालक रणजीत यादव, अंगरक्षक हर्षल हर्षल केणे, विक्की गनात्रा, संदीप सरवणकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलू नये यासाठी माध्यमांनाही परिसरात बंदी करण्यात आली होती.
यासाठी न्यायालयाच्या परिसरातील वाहतुकीत बदल करत 200 मीटर पर्यंत कोणालाही न्यायालयाच्या आवारात फिरकता येणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली होती. तर दोनशे मीटरच्या बाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावून रस्ता बंद करत मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता.
गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतरही प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मी गोळीबार केला असून, मला कोणताही पश्चाताप नसल्याचे विधान करीत मुख्यमंत्र्यांवर पैसे घेतल्याचे आरोप केले होते. यामुळे आज पोलीस व्हॅनच्या बाहेर डोके काढत प्रसार माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी पोलीस माध्यमांना लांब ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.