मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील आरोपी पंकज भुजबळ व अन्य १० जणांना मंगळवारी उच्च न्यायालयाने १० जूनपर्यंत अंतरिम दिलासा दिला. त्यामुळे १० जूनपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) या सर्वांना अटक करू शकत नाही. विशेष पीएलएमए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लॉड्रिंग अॅक्ट) न्यायालयाने २७ एप्रिल रोजी पंकज भुजबळ यांच्यासह ४३ जणांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटला पंकज भुजबळ, असिफ बलवा आणि विनोद गोयंका यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तर अन्य ११ आरोपींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. अजामीनपात्र वॉरंटला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणी न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकांवर सुनावणी घेण्याचा अधिकार एकसदस्यीय खंडपीठाला नाही, असे म्हणत न्या. जाधव यांनी पंकजसह अन्य आरोपींना द्विसदस्यीय खंडपीठापुढे याचिका सादर करण्यासाठी १० जूनपर्यंत मुदत दिली. तोपर्यंत या सर्व आरोपींना अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले. (प्रतिनिधी) >१ जुलैपर्यंत अटक नाहीअटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेल्या राज्यसभा सदस्य संजय काकडे यांच्यासह ११ आरोपींना १ जुलैपर्यंत अटक न करण्याचे आदेश न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठाने दिले.प्रवीण जैन, संजीव जैन, चंद्रशेखर सारडा, जगदीश प्रसाद पुरोहित, बिमलकुमार जैन, संजय काकडे, कपिल पुरी, राजेश मिस्त्री, विपुल कांकरिया, शैलेश मेहता व सुरेश जाजोदिया यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्या. पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठापुढे होती.
पंकज भुजबळ यांना १० जूनपर्यंत दिलासा
By admin | Published: June 08, 2016 3:39 AM