मुंबई - पंजाब अँड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांसाठी रिझर्व्ह बँकेने दिलासा दिला आहे. पीएमसी खातेदारांना आता आपल्या खात्यातून ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. खातेदारांची पैसे काढताना निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे. त्याचबरोबर खातेदारांना पीएमसी बँकेच्याच एटीएममधूनही ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.बँकेचे खातेदार ६ महिन्यात ५० हजार रुपये काढू शकणार आहेत. याअगोदर खातेदारांना ४० हजार रुपये काढता येत होते. पीएमसी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यामुळे आरबीआयने बँकेवर अनेक निर्बंध घातले होते. यामध्ये खातेदारांना पैसे काढण्यावरही निर्बंध होते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे तणाव आलेल्या संजय गुलाटी (५१) आणि फत्तेमुल पंजाबी (५९) या दोन खातेदारांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. तर एका खातेदाराने आत्महत्या केली होती. ओशिवरा येथे राहणाऱ्या गुलाटी यांच्या खात्यात जवळपास ९० लाख तर मुलुंडमधील फत्तेमुल पंजाबी यांच्या खात्यात १० लाखांहून अधिक रक्कम जमा होती. आतापर्यंत पीएमसी बँकेच्या ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे. मागील गुरूवारीच अॅड्य्रू लोबो या एका खातेदाराचा मृत्यू झाला.
पीएमसी खातेदारांना दिलासा; पैसे काढण्याची मर्यादा वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 9:50 PM
५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी देण्यात आली आहे.
ठळक मुद्देखातेदारांची पैसे काढताना निर्माण होणारी अडचण लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने मंगळवारी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली आहे.आतापर्यंत पीएमसी बँकेच्या ८ खातेदारांचा मृत्यू झाला आहे.