- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सेवेत गैरहजेरीस्तव बडतर्फ करण्यात आलेले कर्मचारी आणि अपहार प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या वाहकांची पुनर्नेमणूक करण्यात येणार आहे. या कर्मचा-यांना बडतर्फ करण्यात आल्याने त्यांच्या कुटूंबियांची होणारी आर्थिक कुचंबणा थांबावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील महामंडळाच्या हजारो कर्मचा-यांना दिलासा मिळणार आहे, या शिवाय महामंडळासही कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. मात्र, या नेमणूकीसाठी संबधित कर्मचा-याचे वय 45 वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक असणार आहे.
राज्यभरात एसटीचे शेकडो कर्मचारी गैरहजर असल्याने बडतर्फ करण्यात आले आहेत. तर हजारो वाहकांवर अपहाराचे ठपके ठेवण्यात आले असून त्यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबधित कर्मचा-यांच्या जागा रिक्त असून महामंडळाचे मनुष्यबळही कमी झाले आहे. या शिवाय हे कर्मचारी बडतर्फ केल्याने त्यांचे वेतन बंद होऊन त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच या अपहार प्रकरणांची चौकशी वर्षानुवर्षे निकाली निघत नसल्याने शेकडो कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या कुटूंबियांनी अनेकादा शासनाकडेही दाद मागितली आहे. त्यामुळे या कुटूंबियांची हेळसांड लक्षात घेऊन एसटी कडून या कर्मचा-यांची पुनर्नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे परिपत्रक काढून महामंडळाने हा निर्णय जाहीर केला असून याबाबतची अधिक माहिती कर्मचा-यांना संबधित विभागात दिली जाणार आहे.
माहिती संकलीत करण्याचे काम सुरू
महामंडळाकडून करण्यात येणारी पुनर्नेमणूक काही अटींच्या आधीन असून असणार आहे. त्यात प्रमुख्याने कर्मचा-याचे वय 45 वर्षपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. संबधित कर्मचा-याची अपहारची तीन पेक्षा कमी प्रकरणे असणे, न्यायालयात दावा सुरू असल्यास न्यायालयाची संमती असणे अशा अनेक अटींचा समावेश आहे. या नेमणूकीबाबत अनेकांनी या पूर्वी अर्ज केलेले असून त्यानुसार, या कर्मचा-यांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू असल्याचे पुणे विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी सांगितले. या नेमणूकीसाठी स्वतंत्र विभाग कार्यरत करण़्यात आला असून त्यानुसार, पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मैंद यांनी स्पष्ट केले.