लातूर : लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसत असले तरी अद्यापही पशुधनाच्या मृत्यूचे प्रमाण आहे. राज्य शासनाने मार्चअखेरपर्यंत दगावलेल्या पशुधनाच्या नुकसानीपोटी पशुपालकांना अर्थसाहाय्य केले होते. एप्रिलपासून मात्र मदतीचे कुठलेही आदेश दिले नसल्याने पशुधन दगावलेले पशुपालक हतबल होऊन मदतीकडे डोळे लावून होते. यासंदर्भात ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्यामुळे राज्य शासनाने आर्थिक मदतीचे आदेश काढले आहेत.
शासनाच्या आदेशाअभावी एप्रिलपासून नुकसानभरपाई देणे बंद होते. आता राज्य सरकारने अर्थसाहाय्याचे आदेश देण्याबरोबर साडेबारा लाखांचा निधीही उपलब्ध करून दिला आहे. तसेच नवीन प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. - डॉ. सूर्यकांत नागरगोजे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन.