मुंबई : विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीदरम्यान सोमवारी प्रादेशिक अस्मिता, धार्मिक श्रद्धा आणि भाषिक प्रेमाचेही दर्शन घडले. मंत्री विष्णू सवरा आणि ज्येष्ठ आमदार गिरीश महाजन यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. सोमवारी 18क् सदस्यांना हंगामी अध्यक्ष जिवा पांडू गावित यांनी शपथ दिली. उर्वरित सदस्यांचा शपथविधी मंगळवारी होणार आहे.
बहुतेक सदस्यांनी ‘ईश्वर साक्ष’ शपथ घेतली. मात्र, ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री वर्षा गायकवाड, भास्कर जाधव आदींनी ‘गांभीर्यपूर्वक’ शपथ घेतली. 11व्यांदा निवडून आलेले गणपतराव देशमुख शपथ घेण्यासाठी उठले तेव्हा संपूर्ण सभागृहाने बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. दोन्ही बाजूंचे अनेक सदस्य शपथ घेऊन परतताना त्यांना लवून नमस्कार करीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथ घ्यायला जाताना शिवसेनेच्या एकाही सदस्याने बाके वाजवून स्वागत केले नाही; पण बाकीच्या सर्वानी स्वागत केले. सरदार तारासिंह यांनी गुरुनानक, गुरू गोविंदसिंग यांचे स्मरण केले आणि ‘बोले सो निहाल’ने शेवट केला. ज्योती पप्पू कलानी यांनी सिंधी भाषेतून तर धुळे जिल्ह्यातील भाजपाचे आमदार जयकुमार रावळ यांनी अहिराणीतून शपथ घेतली. मनुष्यबळ विकासमंत्री विनोद तावडे यांनी आपला नामोल्लेख करताना आई विजया यांचाही उल्लेख केला.
सन 2क्क्9मध्ये अबू आझमी
यांनी हिंदीतून शपथ घेतली म्हणून मनसेने विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ घातला होता. मनसेचा एकच सदस्य या वेळी निवडून आला आहे. अबू आझमी यांनी हिंदीतून शपथ घेतली तेव्हा विरोधाचा साधा सूरही उमटला नाही. (विशेष प्रतिनिधी)
1वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चपला बाजूला काढून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करीत शपथ घेतली. नसीम खान, हसन मुश्रीफ, अबू आझमी या मुस्लीम सदस्यांनी ‘अल्ला साक्ष’ शपथ घेतली. केजच्या भाजपा आमदार संगीता ठोंबरे यांनी बसल्या-बसल्या मंत्री पंकजा मुंडे यांचे आपल्या मोबाइलवरून फोटो काढले. त्याचा फ्लॅश सभागृहात चमकत होता.
2माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन करून शपथ घेतली. राज्यमंत्री दिलीप कांबळे, वर्षा गायकवाड यांनी शपथेचा शेवट ‘जय भीम’ने केला. अकोल्याचे भाजपा आमदार गोवर्धन शर्मा यांनी ‘जय श्रीराम’चा घोष केला. सिद्धराम मेहेत्रे यांनी ‘श्री स्वामी समर्था’ची साक्ष ठेवत शपथ घेतली. शिवसेनेच्या बहुतेक आमदारांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ने शेवट केला. भाजपाचे डॉ. संजय कुटे आणि काँग्रेसचे अमर काळे यांनी आपल्या आईवडिलांचे स्मरण केले.
3गेल्या विधानसभेत भाजपाचे आमदार बसायचे ती संपूर्ण जागा आणि बाजूची काही जागा सोमवारी शिवसेनेच्या आमदारांनी व्यापली होती. त्याच्या बाजूला पुढच्या आसनांचा ताबा राष्ट्रवादीने घेतला होता. काँग्रेसचे आमदार त्यांच्या मागे बसले होते. सत्तापक्षाच्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी भाजपाचे आमदार बसले होते.