पुणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शपथ घेतली त्या दिवसापासून विरोधक दोन महिन्यांत हे सरकार पडेल, चार महिन्यांत सरकार पडेल असे म्हणत आहेत. तरीदेखील आम्ही एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यामुळे उरलेली चार वर्ष देखील भाजपच्या नेत्यांची असे म्हणण्यात जातील, याची मला खात्री आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील भाजपवर निशाणा साधला आहे.
पुणे पदवीधर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना महाआघाडीच्या वतीने अरुण लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उपस्थित होते. तर भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेकडून प्रा.एन.डी.चौगुले यांनी उमेदवार अर्ज दाखल केला. यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार (दि.12) अखेरचा दिवस होता. यामुळे गुरूवारी सकाळ पासूनच इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली. उमेदवारांची संख्या अधिक असल्याने एकच गोंधळ उडाला. त्यात महाआघाडीचे लाड आणि रयतचे चौगुले यांचा अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला. पोलिसांनी तोड देखले काही मास्क न घातलेल्या कार्यकर्त्यांना दंड देखील केला. --------चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून रयत क्रांती संघटनेकडून चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रत्येक पक्षाला निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्याचा हक्क आहे. त्यानुसार चौगुले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर उमेदवारी मागे घ्यायचे की नाही, याबाबतचा निर्णय घेतला जाईल- सदाभाऊ खोत, आमदार व रयत पक्षाचे प्रमुख ------------चंद्रकांत पाटील यांनी आता स्वप्नच पाहावे पुणे पदवीधर मतदार संघात महाआघाडीचा उमेदवार देण्यात आला असून, सर्व पक्ष व मित्र पक्ष एकत्र काम करत आहोत, यामुळे आमचा उमेदवार नक्की निवडून येईल. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी हे सरकार पडेल याचे आता स्वप्नच पहावे. - बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष