कोल्हापूर - बैल म्हातारा झालाय, त्याला घरी बसवा आणि तरण्याबांड खोंडाला विजयी करा असे म्हणणाऱ्या शरद पवार यांना कोल्हापूरकरांनी २००९ च्या लोकसभा निवडणुकीत चांगलाच हिसका दाखवला होता व त्यावेळी वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या सदाशिवराव मंडलिक यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असतानाही विजयी केले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पवार यांना तुमचे वय झालंय, आता घरी बसा असा अप्रत्यक्ष सल्ला दिलाय. त्यावरून या म्हातारा बैलाच्या टिपण्णीची नव्याने आठवण झाली.
निवडणुकीत वातावरण कसे बदलते आणि एकदा लोकांनी ठरवले की ते कसे कितीही मातब्बर नेता असला तरी त्यास धोबीपछाड देतात याचेच ही निवडणूक म्हणजे उत्तम उदाहरण ठरावे. त्याचे अनेक संदर्भ सध्या जे महाराष्ट्रात सुरू आहे, त्याला लागू पडणारे आहेत. दिवंगत खासदार मंडलिक हे २००९ ला राष्ट्रवादीचे खासदार होते. आपला उत्तराधिकारी ठरवताना आपल्याला विश्वासात घ्यावे एवढीच त्यांची अपेक्षा होती; परंतु त्यावेळी हसन मुश्रीफ हे पवार यांच्या जास्त जवळ होते. त्यांनी या म्हाताऱ्याच्या आता कोण मागे आहे असे चित्र निर्माण केले.
मंडलिक यांचा सासने मैदानात अमृतमहोत्सवी सत्कारही पवार यांच्याच हस्ते झाला आणि तेथून परत जाताना दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पवार यांनी संभाजीराजे यांची उमेदवारी निश्चित केली. त्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार धनंजय महाडिक यांना राजकीय दबाव वापरून गप्प बसवण्यात आले. तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी महाडिक यांची समजूत काढताना पुरेवाट झाली होती. संभाजीराजे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आता फक्त गुलालच लावायचा बाकी राहिलाय, निवडणूकसुद्धा घ्यायची गरज नाही अशीच हवा तयार झाली. झाडून सारे नेते त्यांच्या मागे होते. मंडलिक यांना तुम्ही लढू नका म्हणून सांगायला गेलेल्या लोकांना ते शिव्या देऊन हाकलून देत होते. शेवटी माझे एक मत तरी मला पडेल की नाही असा त्यांचा पवित्रा. अखेर त्यांनी शड्डू ठोकलाच. वातावरण चांगलेच तापले. त्यातच पवार यांची कोल्हापुरातील महाराणा प्रताप चौकात जाहीर सभा झाली. त्यामध्ये त्यांनी या म्हाताऱ्या बैलास आता घरी बसवा असे आवाहन केले; परंतु तिथेच त्यांचा पाय खोलात गेला.
कृषी संस्कृतीत बैल म्हातारा झाला म्हणून शेतकरी त्याला कधी वाऱ्यावर सोडत नाही. त्याची जपणूक करतो. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेने या म्हाताऱ्या बैलास डोक्यावर घेतले आणि पवार यांनी दिलेल्या तरण्याबांड संभाजीराजे यांना पराभूत केले. ही निवडणूक मंडलिक विरुद्ध संभाजीराजे अशी कागदावर झाली तरी प्रत्यक्षात लोकांनी तिला मंडलिक विरुद्ध पवार असेच स्वरूप दिले. आता अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय काढले आहे. आता या म्हाताऱ्या बैलाला महाराष्ट्राची जनता डोक्यावर घेते की घरी बसवते याचीच उत्सुकता आहे.
जनमानस महत्त्वाचे..
मंडलिक यांची ही लढत देशपातळीवर गाजली. या वयातही त्यांची लढाऊवृत्ती लोकांना भावली. सत्ता, संपत्ती, नेते सगळे पाठीशी असतानाही संभाजीराजे निवडून येऊ शकले नाहीत. कारण लोकांनी कुणाला विजयी करायचे यापेक्षा कुणाला पाडायचे हे अगोदरच ठरवले होते. कोल्हापुरातून मंडलिक व हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची गट्टी जमली आणि त्यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी दिली.