पुणे : पानशेत धरणफुटीने पुणे शहरात हाहाकार माजविला होता़ या महापुरात बेघर झालेल्यांसाठी शासनाने शहराच्या ८ ठिकाणी वेगवेगळ्या वसाहती स्थापन करून त्यात ३ हजार ९८८ कुटुंबंची व्यवस्था केली़ या घटनेला आता ५५ वर्षे झाली़ या पूरग्रस्तांना मालकीहक्काने घरे देण्याचा, त्यांनी केलेली वाढीव बांधकामे नियमित करण्याचा शासन निर्णय झाला पण, त्याची अंमलबजावणी अद्याप झाली नसून ती प्रशासकीय पातळीवर अडकली आहे़ या पूरग्रस्त कुटुंबांपैकी अनेकांनी घरांची विक्री केली आहे़ शासनाने ही घरे त्यांना मालकीहक्काने दिली असली तरी हे हस्तांतरण अद्याप होत नाही़ पूरग्रस्त वसाहतीतील घरांचे हस्तांतरण नियमित करावे, येथे झालेले वाढीव बांधकामे नियमित करावीत, विकास आराखड्यात टाकलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी पानशेत पूरग्रस्त समितीचे अध्यक्ष मंगेश खराटे यांनी केली आहे़ पानशेत पूरग्रस्तांना दत्तवाडी, एरंडवणा, पर्वती दर्शन, शिवदर्शन, जनवाडी, हेल्थ कॅम्प, सेनादत्त पेठ, भवानी पेठ या ठिकाणी शासनाने ओटा स्किम, गोलघरे आणि शेजघरे बांधली़ त्यात ३ हजार ९८८ कुटुंबाची सोय करण्यात आली़ सन १९९१मध्ये शासनाने या कुटुंबांना ही घरे मालकीहक्काने देण्याचा निर्णय घेतला़ पण या निर्णयानंतर पुढे काहीही हालचाली झाल्या नाहीत़ घर मालकीचे असले तरी तेथे बांधकाम करणे, दुरुस्ती करणे अथवा खरेदी-विक्री करणे यापैकी काहीही बाबी पूरग्रस्त करू शकत नव्हते़ शासनाने मालकीहक्काने देण्याचा निर्णय घेतला तरी त्यांच्या नावावर ती झाली नव्हती़ त्यासाठी प्रामुख्याने शासनाने पॉपर्टी कार्डवर त्यांचे नाव लावले नव्हते़.
पानशेत पूरग्रस्त समितीने केलेल्या पाठपुराव्याला २२ वर्षांनी यश येऊन २०१३मध्ये शासनाने अध्यादेश काढला़ त्यानंतर या पूरग्रस्त कुटुंबीयांना पॉपर्टी कार्ड देण्यात आले़ काही कुटुंबांनी रक्कम भरली नव्हती़ त्यांच्याकडून १९९१च्या रेडीरेकनरनुसार रक्कम घेऊन ३०० जणांना नव्याने पॉपर्टी कार्ड देण्यात आले़
इतक्या वर्षांनंतर आता पूरग्रस्तांचे कुटुंब वाढले़ त्यामुळे त्यांनी घराच्या बाजूला असलेल्या रिकाम्या जागेवर बांधकाम करण्यासाठी कोणतीही परवानगी मिळत नव्हती़ शासनाचा निर्णय झाला असला तरी त्याची अंमलबजावणी नसल्याने अशा बांधकामासाठी कोणत्याही बँकांकडून गृहकर्ज मिळत नाही़ कोणतेच नियोजन नसल्याने या वसाहतीत जवळपास सर्वांनी आपापल्या सोयीनुसार कोणत्याही नियमाचा विचार न करता वाढीव बांधकामे केली़ या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेकडून अनेकदा कारवाई झाली़ पण, काही ठिकाणी झालेल्या कारवाया नंतर थांबल्या़