गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की सरकार आठवते, अजित पवार...; राज ठाकरे बोलून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2023 09:17 PM2023-12-02T21:17:54+5:302023-12-02T21:19:01+5:30
राज यांनी वडापाव महोत्सवात येऊन वडापाव खाणे टाळले. याचे त्यांनी कारणही सांगितले. यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज वडापाव महोत्सवाला आले होते. यावेळी त्यांनी वडापाव पाहिला की गेल्या वर्षभरापासून सरकारची आठवण येते, असा टोला राज यांनी लगावला. तसेच राज यांनी वडापाव महोत्सवात येऊन वडापाव खाणे टाळले. याचे त्यांनी कारणही सांगितले. यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता.
फडणवीस आणि शिंदेंमधला वडा अजित पवार आहेत की अजित पवार आणि फडणवीसांमधला वडा शिंदे आहेत की त्या दोघांमधला वडा फडणवीस आहेत, हेच गेली वर्षभर कळत नाहीय, असे राज ठाकरे म्हणाले. यावेळी राज यांनी किर्ती कॉलेज, शिवाजी पार्क इथला वडापाव खाऊनच मी मोठा झाल्याचे सांगितले. यावेळी राज यांनी सचिनच्या वडापाव प्रेमाचा देखील किस्सा सांगितला.
वडापाव ही संकल्पना अशोक वैद्य आणली. त्यांना महाराष्ट्र भूषण जाहीर करावा अशी मागणी राज यांनी केली. अशोकरावांचे आभार की त्यांनी कित्येक पिढ्या घडवल्या आणि गाड्या उभ्या करण्याची संधी दिली, असे राज म्हणाले.
मी वडापाव खाऊ शकत नाही...
महोत्सवात एवढे स्टॉल लागलेत. परंतू, खूप इच्छा असूनसुद्धा इथे मला वडापाव खाता येणार नाही. परंतू, खरोखरच मला वडापाव खायचा आहे, असेही राज म्हणाले. मीडियाच्या कॅमेरांकडे बोट दाखवून हे काही मला सोडत नाहीत, दुसऱ्या दिवशी ऑSSS सारखे वेडेवाकडे फोटो येतात. त्यामुळे मी यांना पार्सल द्यायला सांगितलेय. मी घरी जाऊन वडापाव खाईन, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.