बारामती : गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव घेतला आहे. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून शिक्षण पूर्ण केले. ‘कमवा व शिका’ योजनेत मातीच्या पाट्या वाहिल्या. त्यातून मिळालेल्या पैशातून बहिणीचे, स्वत:चे शिक्षण पूर्ण केले... सत्य तेच बोलायचे... हे ध्येय ठेवून काम केल्यामुळेच एक सामान्य मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकला, असा जीवनपट आर. आर. पाटील यांनी बारामतीच्या शारदा व्याख्यानमालेत उलघडला होता. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले होते. येथील नवनिर्माण संघटनेचे संयोजक अनिल गलांडे यांनी २००७ साली आर. आर. आबा यांना ‘मी कसा घडलो’ या विषयावर बोलते केले होते. शारदा व्याख्यानमालेच्या अंतर्गत पाटील यांनी त्यांचा जीवनपटच उलघडला होता. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे कपडे वापरत नाहीत, अशी परंपरागत रीत आहे. मात्र, त्यांची कपडे कमी करून वापरल्याचे सांगताना त्यावेळी बारामतीतच उपविभागीय पोलीस अधिकारी असलेल्या संजय शिंत्रे या अधिकाऱ्याच्या वडिलाने धीर दिला होता, असे पाटील यांनी सांगितले. शिक्षणासाठी माती वाहिली. वक्तृत्व स्पर्धेतून बक्षिसे मिळविली. या स्पर्धांमधूनच तयार झालो. ज्या दिवशी जिल्हा परिषदेचा सदस्य झालो होतो. त्याच दिवशी शाळेच्या पडवीत झोपलो. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर पायात चप्पल आली. कोणत्याही ठेकेदाराचा मिंधा झालो नाही. सत्य या न्यायाने लोकांची कामे करून राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. पाटील आपला जीवनपट एका पाठोपाठ उलघडत होते. बारामतीच्या शारदा प्रांगणात व्याख्यान ऐकण्यासाठी आलेल्यांमध्ये ‘पिनड्राप सायलेन्स’ होता. त्यांच्या जीवनातील अनुभव ऐकून उपस्थित श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहिले होते. जवळपास पावणे दोन तास आबांनी त्यांच्या जीवनातील पैलू उलघडून दाखविले. जिल्हा परिषद सदस्य ते आमदार झाल्याचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या पाठिंंब्यामुळेच डान्सबार बंदी, पोलिसांचे वेतनवाढ, भरतीतील गैरप्रकार थांबविला. तर ग्रामविकास मंत्री म्हणून गाडगेबाबा स्वच्छता अभियान, यशवंत ग्रामसमृद्धी योजनेच्या माध्यमातून गावांचा विकास केल्याचे सांगितले होते.गटसचिवांचे अधिवेशन अखेरचा कार्यक्रम४गेल्या आॅगस्टमध्ये पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात गटसचिवांच्या अधिवेशनात आर. आर. पाटील उपस्थित होते. हा त्यांचा पुण्यातील शेवटचा जाहीर कार्यक्रम ठरला. अधिवेशनात सर्वात आधी उपस्थित झालेल्या आर. आर. पाटील यांनी मी गृहमंत्री म्हणून या कार्यक्रमाला आलो नाही, गटसचिवाचा मुलगा म्हणून आलो आहे. माझे वडील गटसचिव म्हणून काम करीत असत. या गटसचिवांच्या घरात काय यातना असतात हे मला माहिती आहे, असे म्हणत मने जिंंकली. ४ तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. ते तब्बल तीन तास उशिराने कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यांच्या आधी उपस्थित झालेल्या आर. आर. पाटील यांच्यामुळे चैतन्य निर्माण झाले. पांढऱ्या रंगाची सफारी त्यांनी परिधान केली होती. ४प्रसन्न मूडमध्ये त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले होते. प्रश्न सोडविण्यासाठी जसे हक्काने आमच्याकडे येता, तसे निवडणुकीच्या काळात आम्हालाही तुमच्याकडे हक्काने येऊ द्या, अशा शब्दांत पक्षाला मते देण्याचे आवाहन करायला आर. आर. पाटील विसरले नव्हते. हर्षवर्धन पाटील यांना आजही हा प्रसंग जसाच्या तसा आठवतो.