ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - राज्यात जीआर काढणे म्हणजे सांडाचे दूध काढण्याइतके कठीण काम असल्याचे मत तरुण भारत संघाचे अध्यक्ष आणि जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. लोकमत वॉटर समिट 2017 या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले की, राज्यातील छोट्या नद्या मरत आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी समाजाला नद्यांशी जोडले जायला हवे. तसेच, नद्यांतील पाणी तलावात सोडले तर कितीही पूर आला तरी कोणतेही संकंट ओढावणार नाही. नद्यांच्या बाबतीत मध्यप्रदेश सरकारने चांगले काम केले आहे. महाराष्ट्रात नमामी चंद्रभागा यात्रा सुरु होणार असून जनतेने या यात्रेत मोठ्याप्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र सिंह यांनी केले. याचबरोबर, त्यांनी सांगितले की, देशभर जलसाक्षरता यात्राही आम्ही राबवत आहोत. जलसाक्षरता हे अतिशय महत्त्वाचे काम आहे. सुरुवातीला मी फावड्याने तलाव करायचो. मात्र, आता मी लोकांच्या डोक्यात तलाव करण्याचे काम हाती घेतले, त्यामुळे त्यांना पाण्याचे महत्व कळल्याशिवाय राहणार नाही, असेही डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले.
समाजाला पाणी संवर्धन करावे लागेल, त्याशिवाय देश पाणीदार बनू शकणार नाही. भारत भाग्यशाली आहे, फोर्स मायग्रेशन आपल्याकडे नाही. तसेच, पावसाचे चक्र बदलले आहे. मात्र, शेतकरी ते चक्र अजून समजू शकलेला नाही. त्यामुळे पावसाच्या चक्रानुसार पिकांचे नव्याने नियोजन करावे लागणार, असल्याचे मतही डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.
दरम्यान, जलसमृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत लोकमत समूहातर्फे आज लोकमत वॉटर समिट 2017चे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते समिटचे उद्घाटन करण्यात आले. तर, जलसंधारणमंत्री राम शिंदे, पाणीपुरवठा आणि स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांची या समिटला विशेष अतिथी म्हणून उपस्थिती आहे.