पुणे : लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न बुधवारी दुपारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत मार्गी लागला. ही जागा देण्यास संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी तत्वत: मान्यता दिली. त्यामुळे आता विमातळावरील विमानांची संख्या वाढून त्याचा पुणे शहरातील प्रवाशांना फायदा होणार आहे. तसेच हवाई दलाची सुमारे १८ एकर अतिरिक्त जागा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. दिल्लीतील बैठकीला पर्रिकर यांच्यासह केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, मंत्री बापट, खा. अनिल शिरोळे, एअरपोर्ट आॅथरिटी आॅफ इंडियाचे सदस्य (नियोजन) एस. रहेजा व अन्य अधिकारी उपस्थित होते. १७ वर्षे रेंगाळत पडलेला हा विषय मार्गी लागावा म्हणून बापट प्रयत्नशील होते.लोहगाव विमानतळाचा विस्तार होणे गरजेचे होते, मात्र त्यासाठी लागणारी अतिरिक्त जागा लष्कराच्या मालकीची होती. त्यावर त्यांचा आॅईल डेपो व काही जुन्या इमारती आहेत. जागा देण्यास त्यांची परवानगी आवश्यक होती. पुण्यातील विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येसाठी विमानतळाला अतिरिक्त जागा हवी होती. तशी मागणी बापट यांनी पर्रिकर यांच्याकडे केली होती.विमानतळासाठी लष्कराची जागा साधारण ३१ वर्षांच्या कराराने मिळेल. लष्कराला दिल्या जाणाऱ्या जागेत त्यांच्या जुन्या जागेतील इमारती आहे तशाच बांधून देण्याचाही निर्णय बैठकीत झाला. (प्रतिनिधी)लोकमत’च्या प्रयत्नांना यश ‘लोकमत’च्या व्यासपीठावर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन विजय दर्डा यांनी पुण्यातील वाहतूक प्रश्नांसंदर्भात मागण्या केल्या होत्या. या सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले होते. त्याप्रमाणे सातत्याने बैठका घेऊन विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला. ‘लोकमत’च्या या प्रयत्नांना यश आल्याने पुणेकर समाधान व्यक्त करीत आहेत.
लोहगाव विमानतळ जागेचा प्रश्न निकाली
By admin | Published: February 23, 2017 3:58 AM