मुंबई : एटीएममधून पैसे काढण्याच्या दैनिक कमाल मर्यादेत रिझर्व्ह बँकेने सोमवारी वाढ केल्याने, बँक खातेदारांना आता त्यांच्या प्रत्येक कार्डाने एटीएममधून जास्तीत जास्त १० हजार रुपये काढता येतील. आधी ही मर्यादा प्रत्येक कार्डाला दिवसाला ४,५०० रुपये होती.रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, एटीएममधून पैसे काढण्याची दैनिक मर्यादा वाढविली असली, तरी बँकेच्या प्रत्येक बचत खात्यातून पैसे काढण्यावर असलेली २४ हजार रुपयांची साप्ताहिक कमाल मर्यादा यापुढेही कायम राहील. परिणामी, नोटाबंदीने गेले दोन महिने ग्रासलेल्या नागरिकांना पूर्वीपेक्षा अधिक रोकड हाती येईल, असे नाही. प्रत्यक्ष बँकेत न जाता आता एटीएमवरून जास्त रोकड काढता येईल, एवढेच.याचप्रमाणे चालू बँक खात्यांमधून पैसे काढण्यावरील सध्या असलेली ५० हजार रुपयांची साप्ताहिक मर्यादाही वाढवून दुप्पट म्हणजे एक लाख रुपये करण्यात आली आहे. ही वाढीव मर्यादा ‘ओव्हरड्राफ्ट’ आणि ‘कॅश क्रेडिट’ खात्यांनाही लागू असेल, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले. या वाढीव मर्यादेचा फायदा खासकरून व्यापारीवर्गास होईल. ‘नोटाबंदीची कळ ५० दिवस सोसा’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितले, पण ही कळ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत, याचेच हे द्योतक आहे. (विशेष प्रतिनिधी)
एटीएममधून आता रोज काढा १० हजार रुपये
By admin | Published: January 17, 2017 6:41 AM