पुणे - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून छत्रपती उदयनराजे आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. राज्यपाल हे सन्मानाचं पद आहे. त्यांना जबाबदारी कळत नसेल तर त्यांना त्या पदावर बसण्याची आवश्यकता नाही. शिवभक्त म्हणून मी परखड मत मांडले आहे. मी याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहे. सगळ्या नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. २८ तारखेपर्यंत राज्यपालांवर काय कारवाई करतात ते पाहू असा सूचक इशाराच उदयनराजेंनी भाजपाला दिला आहे.
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजे म्हणाले की, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या तोंडून शिवरायांबद्दल जे वाक्य ऐकलं त्यानंतर क्षणभर मला काहीच कळालं नाही. राज्यपालांनी हे वक्तव्य केले त्याला आधार काय? आज छत्रपतींचे विचार जुने झाले असं ते म्हणतात. मग ज्यावेळेस संपूर्ण देशभरात अनेक राजे मुघलसाम्राज्यासमोर शरण गेले. त्यावेळी एकमेव छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी विरोध केला होता. हा विरोध स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हता तर लोकांना न्याय देण्यासाठी सन्मान मिळवून देण्यासाठी होता. हा विचार उराशी बाळगून संपूर्ण आयुष्य ज्यांनी वेचले त्यांच्याविषयी असतं बोलतात असं त्यांनी सांगितले.
तसेच सुधांशू त्रिवेदीची बुद्धी भ्रष्ट झालीय का? एवढ्या मोठ्या मुघल साम्राज्याविरोधात सगळे शरण जात होते तेव्हा छत्रपती शिवराय त्यांच्याविरोधात उभे राहिले. अशी विधानं करताना लाज वाटत नाही का? कशाचा आधार घेऊन बोलताय. वंशज म्हणून आहे पण त्याआधी शिवभक्त म्हणून मी माझे मत मांडतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा सोडून चालणार नाही. शिवरायांनी देशातील प्रत्येक नागरिकाला कुटुंब म्हणून मानलं. आज काय परिस्थिती आहे? लोकशाहीची संकल्पना शिवरायांनी त्याकाळी मांडली. जगात कुठल्या राजाने लोकशाहीचं संकल्पना मांडली? रयतेचं राज्य असं शिवाजी महाराजांच्या राज्याचा उल्लेख होतो. मी खासदार नंतर आधी शिवभक्त, पक्ष वैगेरे नंतर पाहू. मी तडजोडीचं राजकारण करत नाही. शिवरायांच्या मुद्द्यावर अजिबात माघार नाही. २८ तारखेला पुन्हा भेटू. याबाबत काय होतंय ते पाहू असं उदयनराजेंनी स्पष्ट केले.
महापुरुषांचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराजआज संपूर्ण जगात, वेगवेगळ्या देशात अनेक योद्धे, राजे होऊन गेले. त्यांच्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात एक फरक आहे तो म्हणजे इतरांनी त्यांचे राज्य वाढवण्यासाठी लढाई केली. तर छत्रपतींनी सर्वसामान्य लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लढाई केली. छत्रपतींचं नाव घेतलं तरी अंगात ताकद निर्माण होते. बारकाईनं आपण विचार केला तर त्यावेळेस सुद्धा एक दुरदृष्टी विचार शिवरायांनी मांडला. भगतसिंग, क्रांतीसिंह नाना पाटील, नेताजी सुभाषचंद्र बोस, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज होते असंही उदयनराजे म्हणाले.
सर्वधर्मसमभाव हा विचार छत्रपतींनी मांडलासर्वधर्म समभाव, स्वराज्याची संकल्पना हा विचार त्यावेळी छत्रपतींनी मांडला. प्रत्येक जाती धर्मातील लोकांचा शिवरायांनी सन्मान केला. महिला, मुले वडीलधारी लोकांचा सन्मान केला. इतिहास पाहिला तर त्यातून बरेच काही घेण्यासारखं आहे. या वक्तव्याने चीड, राग येतो. या संपूर्ण जगात सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून भारत देश आहे. या भारतात विविध जातीधर्मातील लोकांचे वास्तव्य आहे. या सगळ्यांना एकत्र ठेवायचा असेल तर सर्वधर्मसमभाव हा विचार छत्रपतींनी मांडला. त्याच विचाराच्या आधारावर देश अखंड राहू शकतो असं उदयनराजेंनी सांगितले.
...असं धाडस निर्लज्ज लोक करू शकतातमी पणा शिवरायांच्या काळात नव्हता. आज मी पणा वाढलाय. व्यक्ती केंद्रीत झालं आहे. छत्रपतींचे नाव देणे, पुतळे उभारणं हा सन्मान आहे पण त्यांचे विचार आचरणात आणणार की नाही? देव कोणी पाहिला नाही पण देवाच्या रुपाने एक युगपुरुष जन्माला येतो ते छत्रपती. अशा राजाची अवहेलना केली जाते. छत्रपतींचा अवमान करण्याचं धाडस निर्लज्ज लोक करतात. छत्रपतींचा विसर कसा पडू शकतो असं उदयनराजेंनी विचारलं. राज्यपालांच्या विधानाचा राग सर्वसामान्य लोकांना आलाय. नितीन गडकरी, शरद पवार हे त्या व्यासपीठावर होते. राज्यपालांच्या विधानाचा विरोध व्यासपीठावर करायला हवा होता असंही म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"