कोल्हापूर : स्वीय सहायकामार्फत सोळा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांनी नैतिकता म्हणून महापौरपदाचा राजीनामा देण्याचा आदेश धुडकावला असून, माळवी यांच्या वर्तनामुळे राष्ट्रवादी पक्षाची बदनामी झाली आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशा एकमुखी मागणीचा ठराव बुधवारी महानगरपालिकेत झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. या ठरावाची प्रत आणि वर्तमानपत्रांत आलेल्या बातम्यांची कात्रणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे तातडीने पाठविण्यात आली. महापौर माळवी यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला असल्याने त्यांच्याविरोधात नगरसेवकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांची महानगरपालिकेत बैठक झाली. या बैठकीस पक्षाचे २८ पैकी २६ नगरसेवक उपस्थित होते. उत्तम कोराणे व माधुरी नकाते परगावी गेल्याने बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. गटनेता राजेश लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस शहराध्यक्ष आर. के. पोवार उपस्थित होते. बैठकीत महापौर माळवी यांचे लाच प्रकरण, त्यानंतर झालेली पक्षाची बदनामी आणि पक्षाचा आदेश न जुमानणे या विषयावर चर्चा झाली. राजेश लाटकर व आर. के. पोवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले. त्यानंतर एकमताने तृप्ती माळवी यांना पक्षातून काढून टाकावे आणि तशी शिफारस प्रदेश समितीकडे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व नगरसेवकांनी त्याला हात वर करून संमती दिली. त्यानंतर ‘लाचखोर माळवींचा धिक्कार असो,’ ‘चले जाव, चले जाव; तृप्ती माळवी, चले जाव’ अशा घोषणांनी त्यांनी महापालिका दणाणून सोडली. घोषणा देतच स्थायी समिती सभापती आदिल फरास, गटनेते लाटकर यांच्यासह सर्व नगरसेवक महापौर कार्यालयाकडे गेले; परंतु महापौर माळवी या कार्यालयात नसल्याने सर्वजण महापालिका चौकात गेले. (प्रतिनिधी)महापौरांवर अशी होणार कारवाई महापालिकेतील राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर तृप्ती माळवी यांना पक्षातून काढून टाकण्याचा ठराव झाला.हा ठराव शहराध्यक्ष आर. के. पोवार व गटनेता राजेश लाटकर यांच्या शिफारसपत्राने राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठविला जाणार आहे.त्यांच्याकडून नगरसेवकांची मागणी, झालेला ठराव आणि शहराध्यक्षांची शिफारस यानुसार माळवी यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर होईल. शिफारशीसह ठराव प्रदेशकडेमहापौर माळवी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करावे या मागणीचा ठराव शिफारशीसह प्रदेश समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे आर. के. पोवार यांनी बैठकीनंतर सांगितले. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी फोनवर बोलणे झाल्याचेही त्यांनी सांगितले. माळवी यांच्या हकालपट्टीची कारवाई आता प्रदेशाध्यक्ष तटकरे करतील, अशी अपेक्षा आहे. विधवा आहेत म्हणूनच महापौर महापौर माळवी आपण विधवा असल्याने दबाव आणला जात असल्याचा कांगावा करीत आहेत; पण त्यांची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन, तसेच त्या विधवा आहेत म्हणूनच त्यांना महापौर करण्यात आले; परंतु त्या लाच स्वीकारताना सापडल्या आहेत. त्यामुळे पक्षाची मोठी बदनामी झाली आहे. त्यांना नेत्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला होता, तरीही त्यांनी तो मान्य केला नाही. त्यामुळे त्यांच्या हकालपट्टीचा ठराव करावा लागला. प्रदेशाध्यक्षांच्या मान्यतेने त्यांच्यावर कारवाई होईल, असे गटनेते राजेश लाटकर यांनी सांगितले.
माळवींची पक्षातून हकालपट्टी करा
By admin | Published: March 05, 2015 12:10 AM