शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेसाठी नव्याने अध्यादेश काढा - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2019 05:00 AM2019-07-03T05:00:58+5:302019-07-03T05:05:02+5:30
जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पवार यांनी लावून धरला.
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेत अभ्यासगट स्थापन करुन काही होणार नाही तो पळपुटेपणा आहे, असा आरोप करतानाच नवीन अध्यादेश काढून शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली. या प्रश्नावर अभ्यास गट स्थापन केला जाईल असे उत्तर शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिले होते. त्यावर ते बोलत होते.
जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा पवार यांनी लावून धरला. जे निर्णय सरकार घेते ते निर्णय समाजाच्या भल्यासाठी नसतील तर आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. नवीन कायदा करायचा असेल तर आणि त्यात न्यायायलाचा अवमान होवू नये असे असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत असेही पवार म्हणाले.
मागच्या काळात काय होते हे सांगणे बंद करा. आमच्याकडून राहून गेले म्हणून आम्हाला इकडे बसवले व तुम्हाला तिकडे. आता हे बोलणे बंद करा असा टोला लगावताना पवार म्हणाले, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्या हातात सत्ता दिली आहे तर लोकांची कामे करा. शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. शिक्षक नवीन पिढी घडवण्याचे काम करतात म्हणून त्यांना पेन्शन मिळायला हवी अशी मागणी केली. सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना पूर्ण पगारावर घेतले असते तर कोणतेही सरकार असले तरीही पेन्शन द्यावीच लागली असती असेही पवार म्हणाले. अधिवेशन संपत आहे. विधी न्याय खात्याशी चर्चा करुन करा परंतु अभ्यासगट काही करु शकणार नाहीत. पळवाट काढण्याऐवजी तुम्ही सभागृहात शिक्षकांना पेन्शन योजना लागू करु असा शब्द द्या, अशी मागणीही पवार यांनी केली.