मनोहर कुंभेजकर / मुंबईअरबी समुद्रात ४२ एकरांत भराव टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाच्या जागेबाबत मच्छिमारांचे राज्य सरकारबरोबर असलेले मतभेद काल रात्री वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर दूर झाले. त्यामुळे मच्छीमारांनी ठरवलेला प्रखर आंदोलनाचा निर्णय महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती आणि कफपरेड येथील मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटीने मागे घेतल्याची माहिती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. मुख्यमंत्र्यांबरोबर गेल्या बुधवारी वर्षावर झालेली बैठक निष्फळ ठरली होती. काल रात्री उशिरा पावणेअकरा ते मध्यरात्री १२ पर्यंत पुन्हा वर्षावर मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीला मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, आमदार राम कदम, समितीचे कार्याध्यक्ष लिओ कोलासो, किरण कोळी, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, चेतन पाटील, महेश तांडेल, रोहिदास कोळी, भुनेश्वर धनू, मेश मेहेर, मोरेश्वर पाटील, परशुराम मेहेर, लक्ष्मण धनू यांच्यासह मच्छीमारांच्या ३५ जणांच्या शिष्टमंडळाची उपस्थिती होती.या बैठकीत मच्छीमारांच्या मागण्यांबाबत मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. तसेच या स्मारकामुळे कफपरेड येथील बाधित ३५० मच्छीमारांना चारपट नुकसानभरपाई, शिवस्मारक झाल्यावर येथील पर्यटन क्षेत्रात मच्छिमारांसाठी रोजगार तसेच या क्षेत्रात मच्छीमारांना मासेमारीबाबत कोणतेही निर्बंध घालण्यात येणार नाहीत, सागरी पोलीस ठाण्यात ८० टक्के नोकऱ्या, राजभवन येथील २०० मीटर परिसरातील मासेमारीसाठी असलेली बंदी येथे संरक्षक भिंत बांधल्यानंतर मागे घेण्यात येईल, तसेच स्मारकासाठी टाकण्यात येणारा भराव कमी करून मासेमारीसाठी अधिक क्षेत्र कसे उपलब्ध करता येईल याचा समिती निर्णय घेण्याचे या बैठकीत ठरले.मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका आणि त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळे हे आंदोलन मागे घेतल्याची माहिती किरण कोळी यांनी दिली.मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात भाजपाने केंद्राच्या कृषी मंत्रालयाकडे असलेले मत्स्यव्यवसाय खाते वेगळे करा तसेच सागरी मासेमारी कायदा-२०१६ मध्ये पारंपरिक क्षेत्र मच्छीमारांसाठी आरक्षित ठेवा या मच्छीमारांच्या दोन प्रमुख मागण्या ठेवण्याची मागणी केली. त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही किरण कोळी यांनी सांगितले.शिवस्मारकाला नॅशनल असोसिएशनचा पाठिंबा -च्छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाला नॅशनल असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. गजेंद्र भानजी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. शिवस्मारकाच्या उभारणीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची शान जगात वाढणार आहे. च्शिवाय पर्यटनामुळे मच्छीमार बांधवांना रोजगारही उपलब्ध होईल. एकीकडे गेटवे आॅफ इंडिया, ताज हॉटेल, मंत्रालय, विधानभवन आणि दुसरीकडे शिवस्मारक यामुळे जगात मुंबईचे कौतुक होणार आहे. केवळ भरावाला विरोध करू नये, असे आवाहन डॉ. भानजी यांनी केले आहे. च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर मच्छीमारांना न्याय मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. समुद्रातील भरावामुळे समुद्रात छोटेसे बेट तयार होणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचे कोणतेही नुकसान होणार नाही, असेही डॉ. भानजी यांनी नमूद केले.
स्मारकाच्या जागेवरून मच्छीमारांमधील मतभेद दूर
By admin | Published: December 24, 2016 5:38 AM