पुणे : जागतिक स्तरावर संशोधनात आपण खूपच मागे आहोत. याचे प्रमुख कारण भाषेचा अडथळा हे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर केवळ इंग्रजीमध्ये केलेले संशोधनच ग्राह्य धरण्यात येते आणि आपल्याकडे ग्रामीण आणि तळागाळातून आलेल्या हुशार मुलांना हा इंग्रजी भाषेचा अडथळा पार करता येत नाही. त्यामुळे आपण जागतिक स्तरावर संशोधनात पुढे जात नाही. हे चित्र बदलण्यासाठी आता भारतीय भाषांमध्ये संशोधन करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी ‘इंडियन रँकिंग फ्रेमवर्क’ तयार करण्यात येत आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी दिली.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, पुणे (आयसर) संस्थेस १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी आयसरचे संचालक प्रा. के.एन. गणेश, कुलसचिव कर्नल जी. राजशेखर, अधिष्ठाता जी. अंबिका, प्रा. श्याम राय व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. या वेळी आयसरच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. इराणी म्हणाल्या की, जागतिक संशोधनात आपण मागे असल्याबाबत शिक्षण तज्ज्ञांशी बोलत असताना असे समजले की, आपले संशोधक मागे पडण्यामागचे प्रमुख कारण भाषा आहे. मुलांशी बोलताना असे कळाले की, जी मुले ग्रामीण किंवा दुर्बल घटकातून आलेली असतात त्यांना जेव्हा शिक्षक इंग्रजीतून अभियांत्रिकी, गणिताचे शिक्षण देतात तेव्हा त्यांना पडलेले प्रश्न विचारण्यास ते धजावत नाहीत. आयआयटी गांधीनगरने एक ‘पिअर असिस्टर लर्निंग’ हा उपक्रम सुरू केला असून, यात शिक्षक मुलांना त्यांच्या भाषेतून समजावण्याचा प्रयत्न करतात. (प्रतिनिधी)
संशोधनामधील भाषेचा अडथळा दूर करणार
By admin | Published: February 20, 2016 3:08 AM