सोलापूर : किरकोळ चुकीबद्दल न नांदवता हाकलून दिलेल्या नवऱ्याला मुख्याध्यापक पत्नीने दरमहा दोन हजार रुपयांची अंतरिम पोटगी द्यावी, असे महत्त्वपूर्ण आणि विरळा आदेश दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व्ही. पी. पाटील यांनी नुकतेच दिले. राज्यभरातील हा ऐतिहासिक न्यायालयीन आदेश असल्याचे विधिज्ञांचे मत आहे.सांगलीचा अजय व सोलापूरची संगीता (काल्पनिक नावे) यांचा विवाह २००४ साली झाला होता. संगीता ही उच्च शिक्षित, तर अजय हा अल्पशिक्षित आहे. अजयची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. एका विवाह मेळाव्यात दोघांची ओळख झाली होती. अजयने संगीताला त्याच्या संपूर्ण परिस्थितीची कल्पना दिली होती. संगीता नोकरी करते, त्यामुळे अजय यानेच तिच्या घरी नांदण्यास यावे. तसेच घरातील सर्व कामेही अजयनेच करावी, अशा अटी घालून संगीता लग्नाला तयार झाली होती.ठरल्याप्रमाणे लग्नानंतर अजय संगीताच्या घरी नांदायला आला. संगीताने घातलेल्या सर्व अटींचे तो पालन करीत होता. स्वयंपाक, धुणी, भांडी, केरकचरा तो करायचा. संगीताला जेवणाचा डबा तयार करून देणे, तिचे पाय चेपण्याचे कामही तो करीत असे. संगीता रागीट स्वभावाची होती. तिचे भाऊ पोलीस खात्यात आहेत. एके दिवशी अजयच्या हातून दूध सांडले. एवढ्या कारणावरून संगीताने त्याला शिवीगाळ, मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. पाया पडून माफी मागितली तरीही तिने अजयला दया दाखविली नाही.अजय हा अशिक्षित असून, तो काही कमवू शकत नाही, संगीताने त्याला घरातून हाकलून दिल्यापासून तो हलाखीचे जीवन जगत आहे. त्यामुळे हिंदू विवाह कलम ९ व १४ अन्वये संगीता हिने आपणास नांदवण्यासाठी घरात घ्यावे व प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पोटगी देण्यात यावी, यासाठी अखेर त्याने पत्नी संगीताविरुद्ध सोलापूरच्या दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पत्नीने पोटगी देण्याचा विरळा आदेश
By admin | Published: October 15, 2016 3:26 AM