पुणे - दुसरे बाजीराव पेशवे आणि यशवंतराव होळकर यांच्यात हडपसर येथे युद्ध झाले होते. यावेळी बाजीराव पेशव्यांचा पराभव झाला. होळकरांनी या युद्धात एकहाती विजय मिळवला. यानंतर दुसरे बाजीराव पेशवे कोकणाकडे पळाले हा धनगरांचा इतिहास तरुणपिढीपर्यंत पोहचायला हवा यासाठी शनिवार वाड्याला पेशवे-होळकर वाडा असं नाव देण्यात यावं अशी मागणी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
याबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, हडपसर येथे यशवंतराव होळकर यांच्या पेशव्यांवरील विजयाच्या प्रित्यर्थ विजयस्तंभ उभारणार आहे. धनगर समाज बांधव एकत्र येऊन हा विजयस्तंभ उभारण्यास मदत करणार आहे. दुसरे बाजीराव पेशव्यांनी होळकर साम्राज्यावरील हक्क नाकारल्याने महाराजा यशवंतराव होळकर यांनी हडपसर येथे पेशव्याविरुद्ध १८०२ मध्ये लढाई केली. यामध्ये पराभूत झालेल्या बाजीराव पेशव्यांनी पुण्यातून पळ काढला. तेव्हापासून त्यांना पळपुटे बाजीराव असं संबोधित करण्यात आलं.
काय आहे हा इतिहास?नारायण पेशव्यांच्या खूनाचा आरोप असलेल्या रघुनाथराव पेशव्यांचा आनंदीबाईपासून झालेला पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव, रघुनाथराव इंग्रजांना मिळाल्यामुळे इंग्रज आणि मराठा यांच्यात युद्ध झालं. आनंदीबाई आणि रघुनाथ नजरकैदेत असताना दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झाला. दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मदतीनं दुसऱ्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्र मिळाली मात्र सत्तेचा कारभार दौलतराव शिंदे, बाळोजी कुंजीर आणि सर्जेराव घाटगे यांच्याकडून सुरु होता.
दौलतरावांच्या मदतीने पेशव्यांचेच सरदार असलेल्या मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करुन दौलतरावांच्या सैन्यांच्या हातून मल्हाररावांचा खून झाला. या हल्ल्यातून यशवंतराव होळकर बचावले. त्यानंतर त्यांनी पेशवाईविरोधात युद्धाचा डाव मांडला. १८०२ मध्ये उत्तरेतून यशवंतराव होळकर पुण्यावर चाल करुन आले. दौलतराव आणि दुसरे बाजीराव यांच्या फौजेत हडपसर येथे युद्ध झालं. युद्धात पराभव होत असल्याचं पाहून दुसऱ्या बाजीरावांनी पळ काढत आधी रायगड नंतर वसई येथे इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला.