पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरून सध्या राज्यासह देशातील वातावरण तापले आहे. दरम्यान, या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे. यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयन राजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत उदयनराजेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला. ''आज के शिवाजी नरेंद्र मोदी'' या पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादंगाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेनेला टीकेचे अधिक लक्ष्य केले. ते म्हणाले की,'' मुंबईला असलेल्या शिवसेना भवनात बाळासाहेबांच्या फोटोखाली शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. यावर शिवसेनेने उत्तर दिले पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून आमच्यावर टीका केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आम्ही पाळत आलो आहोत. सत्तेच्या मागे आम्ही कधी गेलो नाही. पण सोयीप्रमाणे राजकारण करायचं ही काही जणांची लायकी आहे. शिवसेनेकडून शिववडा नावाचा वडापाव सुरू करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचे नाव वडापावला देता ? आम्ही शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. खरंतर शिवसेनेचे नाव बदलून ठाकरे सेना केले पाहिजे, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.
यावेळी उदयनराजेंनी शरद पवरांवरदेखील नाव न घेता जाेरदार टीका केली. ''जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज. अनेकांना जाणता राजाची उपमा देतात. त्याचाही मी निषेध करताे. जाणता राजा उमपा देताना विचार करण्याची गरज आहे, असे उदयन राजे म्हणाले.