पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि भाजप यांच्यात औरंगाबाद व उस्मानाबाद शहरांच्या नामांतरावरून जोरदार घमासान सुरु आहे. नामांतराच्या मुद्द्यावरून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी आघाडी व भाजपमधील वरिष्ठ नेतेमंडळी सोडताना दिसत नाही.एकीकडे नामांतराच्या विषयावरून भाजपकडून शिवसेनाकाँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे भाजपच्या एका माजी खासदाराने राज्य सरकारला सल्ला 'हा' खास टोला लगावला आहे.
भाजपाचे माजी खासदार असलेले संजय काकडे यांनी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरला परत जाण्याच्या विधानासह इतरही विविध विषयांवर भाष्य केले आहे. काकडे म्हणाले, राज्य सरकारने कोरोनामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेल्या तरुणांकडे लक्ष दिले पाहिजे. मात्र ते औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबद्दल बोलत आहे. मात्र औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतर केल्यामुळे काहीही एक फरक पडणार नाही. त्यामुळे राज्यातील मोठ्या पक्षांच्या नेत्यांनी तो मुद्दा गौण करून तरुणांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील ठाकरे सरकार स्थिर असून मी त्याविषयी काही भविष्य सांगू शकत नाही असेही स्पष्ट केले.
चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरमधून पण निवडून आणू.. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलता बोलता भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, देवेंद्रजी, मी कोल्हापूरला परत जाणार आहे. यानंतर त्या वाक्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले नसते तरच नवल. पण यानंतर पाटील यांनी देखील त्या वाक्यापाठीमागचा उद्देश स्पष्ट केला. पण आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांचा कोल्हापूरमधून निवडणूक लढविण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि विशेष म्हणजे या मुद्द्यावर कुणी विरोधकांनी नाहीतर पुण्यातील भाजपच्या माजी खासदारानेच मोठे भाष्य केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी जर पुढील निवडणूक कोल्हापूरमधून लढविण्याचा निर्णय घेतला तर त्यावेळी त्यांचा प्रचारप्रमुख मी असेल. आणि एवढंच नाही तर तिथून सुद्धा चंद्रकांत दादांना निवडून देखील आणू. .... आमचे ९८ नगरसेवक कुणाच्याही संपर्कात नाही..भाजपाचे ९८ नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही. निवडणुकाजवळ आल्या की अशा बातम्या, चर्चा झडत असतात. आणि सर्वच पक्षात थोड्या फार प्रमाणात नाराजी ही असतेच.पण ती नाराजी दूर करण्याचा जे ते पक्ष प्रयत्न करत असतात.