ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - 'दुनिया जिसे कहते है', 'होश वालों को खबर क्या', 'चुप तुम रहो, चुप हम रहें' यासारख्या अनेक लोकप्रिय गझल लिहीणारे विख्यात उर्दू शायर निदा फाजली यांचे मुंबईत निधन झाले. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
मुक्तिदा हसन निदा फाजली उर्फ निदा फाजला यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ साली एका काश्मिरी कुटुंबात, दिल्ली येथे झाला, मात्तर शिक्षण ग्वाल्हेर येथे झआले. १९५८ साली त्यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निदा फाजली यांचे वडीलही उर्दू शायर होते. लहान वयातच फाजली यांनी लिखाणाला सुरूवात केली.
एकदा ते एका मंदिरासमोरून जात असताना एक व्यक्ती सूरदासाचे (कृष्णापासून दुरावलेल्या राधाचे दु:ख) भजन म्हणताना त्यांनी ऐकले. त्या पदाच्या सौंदर्यामुळे प्रभावित झालेल्या निदा यांनी कविता लिहीण्यास सुरूवात केली. मात्र उर्दू कवितांमधे फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीर व गालिब यांना आत्मसात केले आणि स्वत:च्या भावना नेमक्या शब्दांत मांडू लागले.
नोकरीच्या शोधात १९६४ साली ते मुंबईत आले. सुरूवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लीट्स मासिकांसाठीही लेखन केले. त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे हिंदी व उर्दूतील अनेक साहित्यिक तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभावित झाले.
विख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या 'रझिया-सुलतान' चित्रपटासाठी गीते लिहीणारे जान निसार अख्तर यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अमरोही यांनी फाजली यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटातील दोन गाणे लिहून दिली व अशाप्रकारे त्यांनी चित्रपट गीतांसाठी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक गीते तसेच गझल लिहील्या. प्रसिद्ध टी.व्ही. मालिका 'सैलाब'च तसेच 'जाने क्या बात हुई' आणि 'ज्योती' यांचे शीर्षकगीतही त्यांच्याच लेखणीतून उतरले.
१९९४ साली त्यांनी प्रसिद्ध गजलगायक जगजित सिंग यांच्यासोबत काढलेला आल्बम 'इनसाईट'मधील कविता आणि संगीत खूप नावाजले गेले.
फाजली यांना १९९८ साली 'साहित्य अकादमी पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. तर 'सूर' या चित्रपटातील गीतलेखनासाठी २००३ साली त्यांनी 'उत्कृष्ट गीतकारा'चा पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली भारत सरकारने त्यांच्या अमूल्य योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने त्यांना गौरवले.
फाजली यांची साहित्यसंपदा :
काव्यसंग्रह :
- लफ़्ज़ों के फूल
- मोर नाच
- आँख और ख़्वाब के दरमियाँ
- खोया हुआ सा कुछ (१९९६) (१९९८ साली त्यांना या काव्यसंग्रहासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले.)
- आँखों भर आकाश
- सफ़र में धूप तो होगी
लोकप्रिय गझल/ गीते :
- तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( चित्रपट - रझिया सुलतान)
- आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर (चित्रपट - रझिया सुलतान)
- होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (चित्रपट - सरफ़रोश)
- कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता)
- तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता)
- आ भी जा.. ( चित्रपट - सूर)
- चुप तुम रहो, चुप हम रहें (चित्रपट - इस रात की सुबह नहीं)
- दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल)
- हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (गझल)
- अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (गझल)
- टी.व्ही. मालिका 'सैलाब'चे शीर्षकगीत