पूजा दामले , मुंबईमहापालिकेच्या वसाहतीमध्ये कर्मचाऱ्यांना मिळालेली घरे भाड्यावर देऊ शकत नाहीत. मात्र, हा नियम धाब्यावर बसवून कर्मचारी वसाहतीतील घरे १० ते १२ हजार रुपये भाडे आकारून दिली जात आहेत. हा प्रकार शिवडी येथील टीबी रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये घडत आहे. वसाहतीमधील १६४ घरांपैकी ६७ घरांमध्ये भाडेकरू राहत आहेत. रुग्णालय प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी या कर्मचारी वसाहतीवर कारवाई केली होती. या वेळी ५ भाडेकरूंना पकडण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाईदेखील केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाला न जुमानता कर्मचाऱ्यांनी परत भाडेकरू ठेवले आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी ५ इमारतींमध्ये एकूण १६८ घरे आहेत. यापैकी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना १६४ घरांचा ताबा देण्यात आला आहे. घरांचा ताबा मिळाल्यावर ६७ कर्मचाऱ्यांनी आपली घरे भाड्यावर दिली आहेत. ज्या व्यक्तींना ही घरे देण्यात आली आहेत, त्यांच्याकडून दरमहा १० ते १२ हजार रुपये भाडे हे कर्मचारी घेतात. रुग्णालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील काही व्यावसायिक आणि इतर काही जणांना वसाहतीतील घरे भाड्याने देण्यात आली आहेत. रुग्णालय प्रशासनाने या घरांची तपासणी करण्याचा प्रयत्न काही महिन्यांपूर्वी केला होता. मात्र, तत्काळ भाडेकरूंना बाहेर काढून कर्मचारी राहत असल्याचे भासवले जाते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. रुग्णालयात पहिल्यापासूनच सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. सुरक्षारक्षकांच्या १७ जागा रिकाम्या आहेत. रुग्णालय प्रशासन कारवाई न करण्याचे हे एक मुख्य कारण आहे. काही वर्षांपासून हाच प्रकार घडत असल्याचे रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्टरने सांगितले.
अधिक कमाईसाठी वसाहतीतील घरे भाड्याने
By admin | Published: June 16, 2014 3:45 AM