बारामती : ‘साहेब पिंपळी लिमटेकच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्रामस्थांना मालच मिळत नाही. याबाबत माझ्याकडे लेखी पुरावे आहेत. ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. तुम्हीच यापूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश दिले होते. मात्र, महसूल व पोलीस यंत्रणेतील परस्पर टोलवाटोलवीमुळे कारवाई झाली नाही. हा माझा नव्हे तर जनतेचा प्रश्न आहे. आम्हाला न्याय द्या,’ अशी विनंती मागील दोन वर्षांपासून रेशनिंग दुकानातून धान्य मिळत नसलेल्या तक्रारदाराने पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यापुढे केली.२०१४ पासून माहितीच्या अधिकारात सतीश महादेव गावडे पिंपळी लिमटेक (ता. बारामती) च्या रेशनिंग दुकानदाराकडून धान्य मिळत नसल्याबाबत माहिती घेऊन तक्रारी करीत आहे. यापूर्वी ग्रामस्थांनीदेखील एकत्रित येऊन बारामतीच्या तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींवर ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर या स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा काळाबाजार होत असेल तर दुकानदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनीच दिले. मात्र, महसूल व पोलिसांच्या लालफितीच्या कारभारात या आदेशाचे पालन झाले नाही. दुकान सुरूच राहिले. दुकानदाराकडून सुनावणीसाठी आलेलो असतानाच धमकी दिली आहे. आपल्याला त्यांच्याकडून तक्रार केल्यामुळे धोका आहे, असेही सांगितले. बापट यांचे स्वीय सहायक चिंतामणी जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती कदम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता झालेल्या सुनावणीवर निर्णय काय होतो, याकडे त्यांचे लक्ष आहे. मात्र, माहिती अधिकारात लढा देताना अनेक अडचणी, धमक्या, मारहाणीला सामोरे जावे लागलेल्या गावडे यांना प्रशासकीय लालफितीच्या कारभाराचादेखील अनुभव आला आहे. (वार्ताहर)>दुकानाबाबत सुनावणी‘लोकमत आपल्या दारी’ अंतर्गत गावडे यांनी हा प्रश्न मांडला होता. त्यावर ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्याची दखल महसूल प्रशासनाने घेतली होती. त्यावर पुन्हा पिंपळी लिमटेकच्या धान्य दुकानाबाबत सुनावणी झाली. या वेळी तक्रारदार गावडे यांनी बारामती तालुक्यात हे गाव असताना इंदापूर तालुक्यातील कार्डधारकांची नावे या दुकानाला जोडली आहेत. अनेक मृतांची नावेदेखील त्यामध्ये आहेत. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात माल उचलला. सुनावणीदरम्यानच ४२ हजार ८०० पामतेलाचे पुडे या दुकानदाराने उचलले आहेत. >या दुकानदाराने थेट मंत्रालयातून पुन्हा दुकान सुरू करण्याचे आदेश आणले. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या गावडे यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी आणली. त्यानंतर पुन्हा सूत्रे हलली. त्यांच्या तक्रारीवर पालकमंत्री बापट यांच्यासमोरच पुन्हा सुनावणी घेण्यात आली. दुकान पत्नीच्या नावे असले तरी कामकाज त्यांचे पतीच करतात. यापूर्वी आपण तक्रार केल्यामुळे मारहाण केली आहे. पुन्हा मारहाणीच्या भीतीने गाव सोडले. मात्र, हा प्रश्न तडीस नेण्यासाठी लढत आहे. आता तुम्हीच न्याय द्या, असे बापट यांच्या निदर्शनास आणले. त्यांनी यापूर्वी दिलेल्या आदेशाच्या प्रतीदेखील गावडे यांनी सादर केल्या.
तक्रारीनंतर पुन्हा सुनावणी
By admin | Published: June 09, 2016 1:28 AM