जमीर काझी,
मुंबई- पोलीस दलाच्या कार्यपद्धतीचे नियोजन व संचालन करण्यासाठी कार्यरत असलेल्या गृहविभागाच्या वेंधळेपणाचे अजब उदाहरण चव्हाट्यावर आले आहे. अप्पर पोलीस महासंचालक एस. एन. पांडे यांची अस्तित्वातच नसलेल्या पदावर प्रतिनियुक्तीवर बदली करण्याचा प्रकार घडला आहे. तब्बल दीड महिन्यानंतर ही चूक लक्षात आल्यानंतर, संबंधित आदेश बदलण्याची उपरती विभागाला झाली.महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या संचालकपदी अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याची गेल्या काही वर्षांपासून प्रतिनियुक्ती नेमणूक केली जाते. तिन्ही कंंपन्यांमधील गैरव्यवहार वीजचोरीला प्रतिबंध, कारवाई व सुरक्षा याबाबतचे नियोजन व प्रभारी म्हणून ते कार्यरत असतात. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी कार्यरत असलेले सूर्यप्रकाश गुप्ता हे ३० जुलैला सेवानिवृत्त झाले. त्यानंतर, एक महिना हे पद रिक्त होते. त्या पदावर गेल्या १ सप्टेंबरला राज्य पोलीस दलातील महामार्ग वाहतूक नियंत्रण (हायवे ट्रॅफिक) विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक एस. एन. पांडे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा आदेश काढताना गृहविभागाने विद्युत मंडळाच्या संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) असे न काढता, सध्या अस्तित्वात नसलेल्या मुख्य दक्षता अधिकारी राज्य विद्युत कंपनी असे काढले. विशेष म्हणजे, अप्पर महासंचालकांचा दर्जा हा मुख्य दक्षता अधिकाऱ्यापेक्षा वरचा असल्याने त्याबाबत संभ्रम झाला. दोन वर्षांपूर्वीपासून त्याऐवजी संचालक या पदाची निर्मिती करण्यात आलेली होती. मात्र, गृहविभागाच्या कक्ष-१ च्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत पूर्ण माहिती न घेता, एस. एन. पांडे यांची अप्पर महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी अशा पदावर बदली केली. पांडे यांनी त्याबाबत गृहविभागाला कळविल्यानंतर, अधिकाऱ्यांच्या लक्षात ही चूक आली. >आदेश काढताना चूक१ सप्टेंबरला राज्य पोलीस दलातील महामार्ग वाहतूक नियंत्रण (हायवे ट्रॅफिक) विभागाचे प्रमुख अप्पर महासंचालक एस. एन. पांडे यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा आदेश काढताना गृहविभागाने विद्युत मंडळाच्या संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी) असे न काढता, सध्या अस्तित्वात नसलेल्या मुख्य दक्षता अधिकारी राज्य विद्युत कंपनी असे काढले.