मुंबई : औरंगाबाद महापालिकेचे विद्यमान आयुक्त पी.एम. महाजन यांची मंत्रालय पातळीवरून बदली करण्याचे प्रयत्न आधी झाले होते, पण एका वजनदार मंत्र्यामुळे बदली होऊ शकली नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महाजन यांच्यावर आज अविश्वास ठराव मंजूर झाला आहे.महाजन हे एका बड्या भाजपा नेत्यांचे निकटवर्ती आहेत. ज्येष्ठ मंत्री असलेल्या या नेत्यांनी महाजन यांच्या बदलीला विरोध केला होता, असे म्हटले जाते. भाजपा आणि शिवसेनेच्या औरंगाबादमधील नेते आणि नगरसेवकांनी महाजन यांना हटविण्यासाठी प्रयत्न केले. बदली नक्की होईल, असे त्यांना वाटत होते, पण मंत्रालयात डाळ शिजली नाही. त्यामुळे त्यांनी अविश्वास ठरावाचा अधिकार वापरण्याचे ठरविले. सूत्रांनी सांगितले की, भाजपाच्या प्रदेश नेतृत्वाकडे अशा अविश्वास ठरावाची परवानगी मागितली, तेव्हा नेत्यांनी नाऊमेद करण्याचा प्रयत्न केला. वाढत्या दबावापुढे संमती द्यावी लागली, असे म्हटले जाते. नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, महाजन यांच्याविरुद्ध नगरसेवक आणि अधिकाऱ्यांत तीव्र नाराजी असल्याचे लक्षात आले होते. आता ठराव मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्यामार्फत तो मुख्यमंत्र्यांकडे जाईल. त्यांच्या निर्णयावर महाजन यांचे भवितव्य अवलंबून असेल. (विशेष प्रतिनिधी)कायद्याचा अडसर नाहीमहाजन यांना सेवानिवृत्तीसाठी अडीच महिने बाकी आहेत. बदलीच्या कायद्यानुसार सेवानिवृत्तीला सहा महिने बाकी असल्यास बदली करता येत नाही. मात्र, महाजन यांची ही बदली नाही. महापालिकेने त्यांना हटविण्याचा ठराव केलेला आहे. त्यामुळे त्यांची अन्यत्र बदली करण्यात कायद्याचा अडसर येणार नाही, असे नगरविकास विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
मंत्र्यामुळे टळली होती महाजन यांची बदली
By admin | Published: October 21, 2015 2:49 AM