सासवड - बारामती लोकसभा मतदारसंघात यंदाची निवडणूक रंगतदार ठरत आहे. सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्यात. त्यात सुरुवातीला अजित पवारांविरोधात शिवसेनेच्याच विजय शिवतारे यांनी आक्रमक भूमिका घेत मतदारसंघात अपक्ष उभं राहण्याची तयारी केली. त्यानंतर काही दिवसांनी शिवतारे यांची समजूत काढण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आलं. त्यामुळे विजय शिवतारे आता सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र शिवतारेंच्या या भूमिकेवरून एक निनावी पत्र व्हायरल झालं. त्यात महाराष्ट्राचा पलटूराम म्हणून शिवतारेंना डिवचण्यात आलं. हे पत्र शिवतारेंच्या कार्यकर्त्याने लिहिल्याचं सांगण्यात येत होते. परंतु त्यावर कुणाचेही नाव नव्हते.
मात्र आता त्या निनावी पत्राला विजय शिवतारे समर्थक असलेले माणिक निंबाळकर यांनी थेट नाव घेऊन पत्र लिहिलं आहे. निंबाळकर हे एखतपूर येथील राहणारे असून ते शिवतारेंचे समर्थक आहे. या पत्राची सुरुवात करतानाच प्रिय बोगस शिवसैनिक मित्रा, सप्रेम जय महाराष्ट्र करत व्हायरल झालेल्या पत्राला थेट उत्तर दिले आहे.
नेमकं या पत्रात काय म्हटलंय? वाचा जसंच्या तसं...
प्रिय बोगस शिवसैनिक मित्रासप्रेम जय महाराष्ट्र !
तू बोगस पत्रप्रपंच केलास हे पत्रातल्या पहिल्या वाक्यातूनच पुरंदर हवेली मतदारसंघातील शिवसैनिकांनी ओळखलं होतं. शिवसैनिक कधीही स.न.वि.वि. वगैरे शब्दावलीने पारंपारीक पद्धतीचं पत्रलेखन करीत नाही. जय महाराष्ट्र हे आदरणीय बाळासाहेबांनी दिलेलं संबोधन त्याच्या कायम ओठावर असतं . निनावी पत्र लिहिण्यापेक्षा तो बिनधास्त स्वतःच्या नावाने पत्र लिहितो. त्यामुळे हा उपद्व्याप केवळ महायुतीला विरोधासाठीच केलेला असल्याने आम्ही त्याला गांभीर्याने घेत नाही. तसंही तू आधी सामान्य बारामतीकर म्हणून केलेला असाच निनावी पत्रव्यवहार आम्ही अजून विसरलो नाही.
बापूंनी अजित पवारांशी तह केल्याचं दुःख शिवसैनिकांना अजिबात नाही. पण त्यामुळे महाविकास आघाडीच्या तंबूत किती घबराट निर्माण झाली आहे ते अशा बोगस पत्रामुळेच आम्हाला समजलं. ह्याच पुरंदरला महाराजांनी तह करून २३ किल्ले गनिमाला देऊ केले होते. पण त्यानंतर अवघ्या काही कालावधीत आपल्या मुळ किल्ल्यांसह मराठी साम्राज्याला गतवैभव प्राप्त करून दिलं होतं. हल्ला, प्रतिहल्ला, त्याग, समर्पण, तह आणि त्यातून जनकल्याण साधणं हे पुरंदरला नवीन नाही. ज्या माणसाने पुरंदरच्या पाण्यासाठी स्वतःचं अपरिमित शारीरिक नुकसान करून घेतलं त्याला गुंजवणीच्या पाण्यापेक्षा मोठं काहीच नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न या तहातून सुटणार असतील तर असा तह करणं कधीही योग्यच. बारामतीत बसून अशी पत्र लिहिण्यापेक्षा बारामतीच्या सुपे परगण्यात, पुरंदरच्या पूर्व भागात आणि इतर दुष्काळी परिसरात फिरलास तर गुंजवणीचं महत्त्व तुला कळेल. राहिला प्रश्न विश्वासार्हतेचा. महाविकास आघाडी हाच मुळात पलटूराम लोकांचा मेळावा आहे. ज्यांची आयुष्ये स्वार्थासाठी पलट्या आणि कोलांटउड्या मारण्यात गेली त्यांनी विजय शिवतारे यांना विश्वासार्हता शिकवावी हाच मोठा विनोद आहे. खोके वगैरेची आवश्यकता शिवतारे यांना मुळीच नाही. त्यांच्या पुढच्या पिढीलाही नाही. इथला प्रत्येक नागरिक हे जाणतो.
बाकी शिवतारे यांचा आवाका ज्यांना जाणून घ्यायचा होता त्यांना तो अगदी व्यवस्थित कळला आहे. तू खरंच शिवसैनिक असशील तर यापुढे उघडपणे स्वतःच्या नाव पत्त्यासह पत्र पाठव . शिवसैनिक असण्याचा आव आणण्यापेक्षा आपल्या तुतारीची पिपाणी होणार नाही याची काळजी घे.
धन्यवाद. पुन्हा एकदा सप्रेम जय महाराष्ट्र !
तुझा, (माणिक निंबाळकर)मु. एखतपुर ता. पुरंदर जि. पुणे