इनफ इज इनफ : व्हीव्हीआयपी कल्चरचा आरोप अमान्य
मुंबई : व्हीव्हीआयपी कल्चरमुळे एअर इंडियाच्या विमानास उशीर झाला अशा बातम्यांच्या पार्श्वभूमीवर अखेर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयमाचा बांध तुटला. टिष्ट्वटरवरून त्यांनी आक्रमक उत्तर देत, भारतात परतल्यावर, मी मानहानीच्या कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करेन असे म्हटले आहे.‘‘विमान उड्डाणास विलंब झाल्याबद्दलची माहिती दिशाभूल करणारी आहे. मी जर विमानात आधीच बसलो असेन तर शिष्टमंडळाशिवाय मी प्रवास करणार नाही असे कसे म्हणू शकेन. शिष्टमंडळाशिवाय मी प्रवास करणार नाही अशी माहिती पुढे येत असेल तर चूक आहे, कारण मी उड्डाणाची वाट पाहत शांतपणे बसलो होतो, याला सहप्रवासी साक्षीदार आहेत. एकदाही मी मला खाली उतरू देण्याची विनंती केली नाही,’’ असे स्पष्ट करत मुख्यमंत्र्यांनी टिष्ट्वट केले आहे, ‘इनफ इज इनफ, वन्स आय केम बॅक टू इंडिया, आय विल इनिशिएट प्रोसिडिंग्ज आॅफ क्रिमिनल डिफेमेशन.’ मुख्यमंत्र्यांसारख्या जबाबदार व्यक्तीकडून अशी अपेक्षा नव्हती, अशी टीका करत विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री खरे बोलत आहेत की एअर इंडिया, असा प्रश्न उपस्थित केला.