मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेनामध्ये मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादामुळे ही दोन्ही पक्षे दुरावले गेले आहेत. मात्र या दोन्ही पक्षांनी पुन्हा सोबत येऊन सत्ता स्थापन करण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी यांनी शिवसेनेला दिला होता. तसेच भाजपला 3 वर्ष आणि शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा फॉर्म्युला सुद्धा त्यांनी सांगितला होता. तर यावरूनच संजय राऊत यांनी आठवलेंना उत्तर देताना, 'रामदास आठवलेंकडून हेच ऐकायचं बाकी होतं' असा टोला लगावला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची सोमवारी भेट घेतली. त्यांनतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले होते की, मी संजय राऊतांना भेटलो, सरकारस्थापनेबाबत भाजपाला ३ वर्ष मुख्यमंत्री आणि शिवसेनेनं २ वर्ष मुख्यमंत्रिपद घ्यावं असा सल्ला त्यांना दिला. त्यावर जर या फॉर्म्युल्यावर भाजपाची सहमती असेल तर शिवसेना विचार करेल असं ते म्हणाले. याबाबत मी भाजपाशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले होते.
तर यावर बोलताना राऊत म्हणाले की, रामदास आठवलेंकडून हेच ऐकायचं बाकी होतं. रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नसल्याचे सुद्धा राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे भाजपाला शिवसेने उभे केले, जागा दिली. शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक होती. मात्र आता भाजपाने शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलली आहे. भाजपाने युती तोडून आपला जुना आणि सर्वात मोठा मित्र पक्ष गमावला आहे. याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल,असे ही संजय राऊत म्हणाले