७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 02:23 PM2023-09-25T14:23:01+5:302023-09-25T14:34:04+5:30

ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खरगे किंवा INC मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.

Reply within 7 days otherwise we will contest 48 Lok Sabha seats; Vanchit Bahujan Aghadi warning to Congress | ७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा

७ दिवसांत उत्तर द्या अन्यथा लोकसभेच्या ४८ जागा लढवू; VBA चा काँग्रेसला इशारा

googlenewsNext

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात देशात मोदीविरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. देशात इंडिया आणि राज्यात मविआमध्ये अद्याप वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला नाही. वंचितने १ सप्टेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवले होते. परंतु काँग्रेसकडून अद्याप यावर कुठलेही ठोस उत्तर आले नाही त्यामुळे संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला ७ दिवसांची मुदत दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला आघाडी करण्यात रस आहे का? असा प्रश्न करत खरगेंना पाठवलेल्या पत्राची आठवण करून दिली आहे. त्याचसोबत काँग्रेसने ७ दिवसात उत्तर द्यावे अन्यथा लोकसभेतील सर्व ४८ जागांवर निवडणूक लढवू असं त्यांनी म्हटलं आहे. १ सप्टेंबर २०२३ रोजी, वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना एक ई-मेल लिहिला होता. त्यावेळी INC आणि त्यांचे मित्रपत्र इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईत होते.

हा ई-मेल काँग्रेस अध्यक्षांना दोन प्रमुख कारणांसाठी लिहिला होता. एक म्हणजे मुंबईत INDIA आघाडीच्या बैठकीसाठी VBA ला आमंत्रण पाठवले असल्याच्या त्यावेळच्या अफवा खोडून काढण्यासाठी काँग्रेसला विनंती करणे आणि दुसरे म्हणजे VBA साठी दरवाजे खुले आहेत हे सांगणे. “आज भाजपा-आरएसएस देशाला बरबाद करताहेत. जर INDIA आघाडी भाजप-आरएसएसच्या फुटीरवादी विचारसरणी आणि राजकारणाशी लढण्यास खरोखरच गंभीर असेल, तर प्रत्येक धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना सहभागी करून घेणे काँग्रेसचे कर्तव्य आहे. परत एकदा सांगतो, आमचे दरवाजे खुले आहेत” असे तेलंग यांनी लिहिलेल्या ई-मेलच्या समारोपाच्या परिच्छेदात म्हटले होते असं वंचित आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले. याबाबत आज प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेतली.

त्यात ते म्हणाले की, ई-मेल पाठवून आणि तेलंग यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर सार्वजनिक करून जवळपास एक महिना झाला आहे, परंतु मल्लिकार्जुन खरगे किंवा INC मधील त्यांच्या कोणत्याही सहकाऱ्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. VBA ला हे जाणून घ्यायचे आहे की आम्हाला कधीतरी उत्तर मिळणार आहे का? मिळणार नसेल तर काँग्रेसने महाराष्ट्रातील जनतेला समजावून सांगावे की, काँग्रेसला वंचित आणि बहुजनांना आघाडीत सहभागी का करून घ्यायचे नाही? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 6.98 आणि 5.57 टक्के मते मिळविणाऱ्या पक्षाला आघाडीचे आमंत्रण का पाठवले गेले नाही किंवा सामील केले गेले नाही याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत २०१९ पासून ज्या पक्षाची लोकप्रियता आणि मतदारांची संख्या वाढली आहे तो पक्ष युतीत का नाही याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. प्रामुख्याने INC ने त्यांच्याकडून चालवल्या जाणार्‍या सर्व खोट्या बातम्या आणि खोट्या कथा तसेच सोशल मीडियावर नव्याने कामाला लावलेल्या ट्रोल्सकडून VBA ला आमंत्रण मिळाले आणि त्यांनी ते नाकारले हा  खोटारडेपणा थांबवला पाहिजे. जर काँग्रेसला आमच्या ई-मेलला उत्तर द्यायचे असेल आणि VBA सह युती करायची असेल तर ते पुढील ७ दिवसांत उत्तर देऊ शकतात. अन्यथा आम्ही सर्व ४८ जागा लढवण्याच्या आमच्या योजनेनुसार पुढे जाऊ, कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सर्व ४८ जागांसाठी उमेदवार निश्चित करण्याच्या मार्गावर आहोत असंही वंचित बहुजन आघाडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: Reply within 7 days otherwise we will contest 48 Lok Sabha seats; Vanchit Bahujan Aghadi warning to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.