लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दिवंगत लीलाताई परुळेकर यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती हडपण्यासाठी त्यांच्या संपत्तीचे रक्षणकर्ते अॅड. सुनील कदम यांनी खोटे इच्छापत्र तयार केले असून या प्रकरणात ‘सकाळ’चे संचालक प्रताप पवार, अभिजित पवार, सुप्रिया सुळे, मृणालिनी पवार यांच्यासह अन्य संचालकांचा समावेश आहे. या सर्वांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका सामाजिक कार्यकर्त्या अंजली पवार यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. गुन्हा नोंदवल्यानंतर हे प्रकरण सीबाआयसारख्या स्वतंत्र तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांच्या वारसदार लीला परुळेकरांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा सांभाळ करण्याचे काम अॅड. सुनील कदम यांच्याकडे होते. मात्र परुळेकरांची प्रकृती खालावल्यानंतर अॅड. कदम यांनी पवार कुटुंबीयांना परुळेकरांचे ‘सकाळ’मधील ४१.५७ टक्के शेअर्स हडपण्यासाठी मदत केली. तसेच त्यांच्या संपत्तीसंबंधातील सर्व गोपनीय माहितीही पवार कुटुंबीयांना दिली, असा आरोप अंजली पवार यांनी याचिकेत केला आहे.परुळेकरांच्या डिसेंबर २०१०च्या पत्राचा आधार घेत त्यांनी आपली कोट्यवधींची संपत्ती ‘जीव रक्षा अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट’च्या नावे केल्याचा दावा करत सुनील कदम यांनी पुण्याच्या न्यायालयात ‘प्रोबेट’ अर्ज दाखल केला आहे. मात्र २०१० पासून २०१६ पर्यंत परुळेकरांचे हे पत्र का सादर करण्यात आले नाही, असा सवाल पवार यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.अॅड. कदम यांच्याशिवाय ट्रस्टचे विश्वस्त मनोज ओस्वाल, संजय दीक्षित, महेंद्र पिसाळ यांनीही परुळेकरांची संपत्ती ट्रस्टच्या नावे करण्यात यावी, यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. संजय दीक्षित, महेंद्र पिसाळ ही ‘सकाळ’ने नामनिर्देशित केलेली मंडळी आहेत. या व्यक्तींमार्फत ‘जीव रक्षा’च्या माध्यमातून परुळेकरांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न पवार कुटुंब करत आहे, असे अंजली पवार यांचे म्हणणे आहे. तसेच कदम यांनी उच्च न्यायालयात एका याचिकेवर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात परुळेकरांच्या संपत्तीसंदर्भातील एकही कागदपत्र आपल्या ताब्यात नसल्याचे म्हटले होते. परंतु, आता अचानक परुळेकरांचे इच्छापत्र दाखवण्यात येत आहे. याचा अर्थ इतकी वर्षे कदम यांनी संपत्तीसंदर्भातील कागदपत्रे लपवून ठेवली किंवा आता सादर केलेली कागदपत्रे बनावट आहेत, असे अंजली पवार यांचे म्हणणे आहे. तसेच यात केवळ कदम यांचा सहभाग नसून ‘सकाळ’चे संचालक प्रताप पवार, अभिजित पवार, मृणालिनी पवार, सुप्रिया सुळे, बालाजी तांबे, रघुनाथ माशेलकर तसेच ‘जीव रक्षा अॅनिमल वेल्फेअर ट्रस्ट’चे विश्वस्त मनोज ओस्वाल, महेंद्र पिसाळ आणि संजय दीक्षित ही मंडळीही सामील आहेत. त्यामुळे या सर्वांच्या भूमिकेची चौकशी करण्यात यावी. तत्पूर्वी या सर्वांवर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश कोरेगाव पोलीस ठाण्याला द्यावेत, अशी विनंती अंजली पवार यांनी याचिकेत केली आहे.अंजली पवार यांनी परुळेकरांच्या खोट्या इच्छापत्राबाबत २० मे २०१७ रोजी पुण्याच्या कोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही. ‘सकाळ’च्या संचालकांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे पोलीस गुन्हा नोंदवत नसल्याचा आरोपही अंजली पवार यांनी केला आहे.
सुप्रिया सुळे, अभिजित पवारांवर गुन्हे नोंदवा
By admin | Published: June 06, 2017 6:33 AM