मुंबई : सरकारी भूखंडाचा विकास करताना पर्यावरण आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर गुन्हा नोंदविण्याची मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली. गुरुवारी आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अलीकडेच भाजपा सरकारने हेमा मालिनी यांना नाममात्र दरात भूखंड दिल्याने वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना निरुपम म्हणाले की, १९९७-१९९८ साली युती सरकारच्या काळात हेमा मालिनी यांना पहिला भूखंड बहाल करण्यात आला होता. या भूखंडाचा विकास करताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचा अहवालही सादर केला होता. परंतु युती सरकारने यावर कारवाई केली नाही. उलट त्यांना दुसरा भूखंड बहाल करण्यात आला. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी व्हायला हवी. १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात हेमा मालिनी निर्दोष सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांना दुसरा भूखंड देऊ नये, अशी मागणी निरुपम यांनी केली. विरोधकांची टीका, आंदोलने यांचा कोणताच परिणाम सत्ताधारी भाजपा-शिवसेनेवर होत नाही. त्यामुळे भूखंडवाटप प्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. (प्रतिनिधी)भाजपाच्या खासदार आणि बॉलीवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नृत्य संस्थेसाठी सरकारने अंधेरी येथील कोट्यवधी रुपयांचा २ हजार चौरस मीटरचा भूखंड अगदी किरकोळ किमतीत दिल्याने वाद निर्माण झाला आहे.हेमा मालिनी व एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश पोलीस आयुक्तांना द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे.सार्वजनिक मालमत्तेचे वाटप करताना जाहिरात देणे आवश्यक आहे, जेणेकरून सर्व गरजूंना लिलावात भाग घेता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने व उच्च न्यायालयाने अनेक निकालांत म्हटले आहे. राज्य सरकारने या आदेशाला केराची टोपली दाखवत व नियम धाब्यावर बसवून अंधेरीतील कोट्यवधी रुपयांचा भूखंड हेमा मालिनी यांना अगदी किरकोळ दरात दिला आहे, असे सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.
हेमा मालिनींविरोधात गुन्हा नोंदवा - संजय निरुपम
By admin | Published: February 05, 2016 3:55 AM