ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि.24 - हृदय रोगाच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली ‘कोरोनरी स्टेंट’च्या किमती निश्चित करण्यात आल्या आहेत. यामुळे या व्यवसायातील नफाखोरीला अखेर लगाम लागला आहे. परिणामी, काही रुग्णालयांमध्ये ‘स्टेंट’ला घेऊन रुग्णाला वेठीस धरण्याची शक्यता आहे, याची गंभीर दखल नागपूर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घेतली आहे. ‘स्टेंट’बाबत कोणतीही तक्रार ‘एफडीए’च्या टोल फ्री क्रमांकावर करण्याचे आवाहन केले आहे.
शहरात महिन्याकाठी साधारणत: ५००वर अँजिओप्लास्टी होतात. पूर्वी ‘स्टेंट’ची किमत १५ हजार ते दीड लाखांच्या घरात होती. खासगी रुग्णालयांमध्ये ‘स्टेंट’ला घेऊन होणारी रुग्णांची लुटमार लक्षात घेऊन स्टेंटच्या किमतीवर सरकारने नियंत्रण आणले. स्टेंटची किमत सरसकट किमान ७ हजार २०० रुपये व २९ हजार ६०० रुपये केली. यातच आता स्टेंटचे स्वतंत्र बिल देण्याचे आदेश केंद्र सरकारने सर्वच रुग्णालायांना दिले आहे. यामुळे उत्पादक, कंपन्या, वितरक व रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत. चांगल्या दर्जाच्या महागड्या स्टेंट रुग्णालयातून गायब होण्याची शक्यता आहे. काही खासगी इस्पितळांमधील अँजिओप्लास्टी पुढे ढकलण्यास सुरूवात झाली आहे. केवळ तातडीच्या व गंभीर प्रकरणातच रुग्णांना स्टेंट टाकण्यात येत आहे. यासंदर्भातील तक्रारी अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाल्या नसल्यातरी खबरदारी म्हणून त्यांनी टोल फ्री नंबर उपलब्ध करून दिला आहे.
-१८००२२२३६५ नंबरवर करा तक्रार...
औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी केलेल्या आवाहनानुसार, ज्या रुग्णांना ‘स्टेंट’लला घेऊन वेठीस धरले जात असेल, उत्पादक, कंपन्या किंवा वितरक ‘स्टेंट’ देण्यास टाळाटाळ करीत असेल, बील देत नसेल तर या संदर्भातील तक्रार ‘एफडीए’च्या ‘१८००२२२३६५’ या टोल फ्री क्रमांकावर करा. तक्रारीची दखल घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.