बारामती : राज्यात सुरू असलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरीवर बंदी आणण्याचा विचार राज्य सरकार करीत आहे. या ‘आॅनलाईन’ लॉटरीच्या माध्यमातून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा कर मिळतो. लॉटरी बंद केल्यास काय परिणाम होईल, याचा अहवाल राज्याच्या गृह खात्याने सर्व पोलीस ठाण्यांकडून मागवला आहे. आॅनलाईन लॉटरीवर अर्थ, महसूल आणि गृह या खात्यांचे नियंत्रण असते. महाराष्ट्रासह सिक्कीम, मिझोराम, गोवा, नागालँड या राज्यांच्या ‘आॅनलाईन’ सोडती होतात. मटका, जुगार या अवैध व्यवसायातून जनसामान्यांची फसगत टाळण्यासाठी राज्य सरकाराने यापूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरी अर्थ विभागाच्या मान्यतेने सुरू केली. या लॉटरीच्या सोडती सणांच्या काळात होत. त्याचबरोबर बंपर सोडती काढल्या जात. त्याचा कालावधी आठवड्याचा होता. महाराष्ट्र राज्य लॉटरीला सिक्कीम, मिझोराम, गोवा, नागालँड या राज्य सरकारांनी सुरू केलेल्या ‘आॅनलाईन’ लॉटरी सोडतीमुळे फटका बसला. ‘आॅनलाईन’ लॉटरीमुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीला स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरीचे महत्त्व कमी झाल्याने राज्य शासनानेदेखील ‘आॅनलाईन’ लॉटरी सुरू केली. सध्या संपूर्ण राज्यात ‘आॅनलाईन’ लॉटरीचा व्यवसाय तेजीत आहे. त्यावर सरकारचे नियंत्रण असल्यामुळे व्यवहारदेखील पारदर्शी होतो.याच पार्श्वभूमीवर, अनेकांना रोजगारदेखील मिळाला आहे. राज्य सरकारला कराच्या रूपाने मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो; परंतु ‘आॅनलाईन’ लॉटरीचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद केली तर काय परिणाम होईल, याबाबतचा अहवाल गृह खात्याने राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्तांकडून मागवला आहे. त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यांच्या गोपनीय विभागाकडून अहवाल घेतला आहे. ‘आॅनलाईन’ लॉटरी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत खेळली जाते. दर १५ मिनिटांना निकाल असतो. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी खेळणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तर, अनेक बेरोजगारांनादेखील व्यवसाय मिळाला आहे. आता ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे. ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद केली, तर काय परिणाम होईल? किती जण बेरोजगार होतील? राज्याच्या महसुलावर परिणाम होईल का? याबाबत गृह खात्याने विचारणा केली आहे. गृह खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे खरोखरच ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद होणार का, या विवंचनेत व्यावसायिक आहेत. ‘आॅनलाईन’ लॉटरीचे अहवाल मागवण्यात आले आहेत, याला पोलीस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)>‘आॅनलाईन’ लॉटरी सकाळपासून रात्री १० वाजेपर्यंत खेळली जाते. दर १५ मिनिटांना निकाल असतो. त्यामुळे ‘आॅनलाईन’ लॉटरी खेळणाऱ्यांची संख्यादेखील मोठी आहे. तर, अनेक बेरोजगारांनादेखील व्यवसाय मिळाला आहे. आता ‘आॅनलाईन’ लॉटरी बंद करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे.
‘आॅनलाइन’ लॉटरीप्रकरणी मागविला अहवाल
By admin | Published: September 18, 2016 12:41 AM