ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 28 - पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी हिंगोली तालुक्यातील माळहिवरा येथे शेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात पत्रकारांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत रविवारी जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले की, 27 मे रोजी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शिवार संवाद कार्यक्रमात माळहिवरा येथे पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवर भाष्य केले. पत्रकार बांडगुळ आहेत. पाकिट दिले त्याचे असतात, मी कोणाला घाबरत नाही. एखाद्याला बुटाने मारेल, असे बेताल व चिथावणीखोर वक्तव्य केले. यामुळे पत्रकारांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करा. त्यांच्यावर योग्य ती कारवाई न झाल्यास यापुढील भाजपच्या व मुख्यमंत्र्यांच्या आगामी दौऱ्याच्या वार्तांकनावरही बहिष्काराचा इशारा दिला. निवेदनावर तुकाराम झाडे, वसंत भट्ट, नंदकिशोर तोष्णीवाल, प्रद्युम्न गिरीकर, योगेश पाटील, कल्याण देशमुख, कन्हैय्या खंडेलवाल, बालाजी पाठक, डॉ. विजय निलावार, संजय कुलकर्णी, मंगेश शेवाळकर, कैलास खिल्लारे, प्रकाश इंगोले, विजय पाटील, दिलीप हाळदे, नंदू कांबळे, शिवाजी जामुंदे, नारायण घ्यार, गजानन वाणी, मो.एजाज नाईक, विलास जोशी, अरुण चव्हाण, गजानन नाईक, शे. इलियास, नारायण काळे, शे.वाजेद, मुजिब पठाण, चंद्रकांत वैद्य, राजकुमार देशमुख, बी.आर. नायक, विठ्ठल देशमुख, अमोल नायक, दिलीप कावरखे, गजानन हमाने, विश्वनाथ देशमुख, गजानन वाखरकर, संतोष भिसे, दयाशिल इंगोले आदींच्या सह्या आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांना निवेदन दिले. पालकमंत्र्यांनी दौरा गुंडाळलाशेतकरी शिवार संवाद कार्यक्रमात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने पालकमंत्री दिलीप कांबळे दौरा अर्ध्यावर सोडून गेले ते परतलेच नाहीत. सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे तर शेतीमालाला भाव नाही मिळाला की शेतकरी ओरडतात, असे म्हणाल्याने शेतकरी अंगावर जात असल्याने त्यांना पळता भूई थोडी झाली. तर त्याच दिवशी हिंगोलीच्या मोंढ्यात भेट दिल्यावर त्यांनी शेतकऱ्यांचे काहीच ऐकले नसल्याने माध्यमांनीही टीका केली. त्यामुळे वड्याचे तेल वांग्यावर काढत त्यांनी पत्रकारांनाच बुटाने मारण्याची भाषा वापरली अन् नागपूरला निघून गेले. त्यानंतर हिंगोलीला परतणार असे सांगितले जाते होते. मात्र ते तिकडेच पसार झाले.