मुंबई: पॅथॉलॉजी लॅब चालवणे हा वैद्यकीय व्यवसाय असल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने स्पष्ट केले आहे. हा वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे येथे डॉक्टर असणे अनिवार्य आहे. राज्यात बेकायदा पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. तरीही वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे दिशाभूल करत असल्यासंदर्भात महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट मायक्रोबायोलॉजिस्टने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाकडे (एमसीआय) तक्रार केली आहे. पॅथॉलॉजी विषयात एमडी अथवा तत्सम शिक्षण घेतलेली व्यक्तीच स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवू शकते. तरीही डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशन अथवा तत्सम शिक्षण घेतलेल्या व्यक्ती खुलेआमपणे पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत. यांच्यावर बोगस डॉक्टर म्हणून कारवाई केली जाऊ शकते. त्याचप्रमाणे, पॅरामेडिकल बिल आल्यावरही यांना स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करता येणार नाही. तरीही शिनगारे हे या डॉक्टरांना स्वतंत्रपणे पॅथॉलॉजी लॅब चालवता येईल, असे सांगत आहेत. ही दिशाभूल असल्याने यांच्याविरुद्ध एमसीआयकडे तक्रार केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी दिली. नोंदणीकृत डॉक्टरांना काही नियम असतात. डॉ. शिनगारे यांनाही हे सर्व नियम लागू होतात, पण या नियमांची ते पायमल्ली करत आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार केली असल्याचे डॉ. यादव यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
शिनगारे दिशाभूल करीत असल्याची तक्रार
By admin | Published: July 21, 2016 5:33 AM