विशेष प्रतिनिधी अलिबाग : तालुक्यातील कमळपाडा गावातील ८० कुटुंबांवर गावकीने सामाजिक बहिष्कार टाकल्याप्रकरणी दाखल खटल्याची शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणीअंती ८० बहिष्कृत कुटुंबांपैकी मधुकर ठाकूर यांना आलेल्या धमकीच्या दूरध्वनींचा तपास करून, ३ आॅक्टोबर पूर्वी न्यायालयास अहवाल सादर करावा, असे आदेश प्रथम श्रेणी न्यायाधीश अनुज आर. कांबळे यांनी पोलिसांना दिले असल्याची माहिती, या खटल्यात शासन नियुक्त विशेष सरकारी वकील अॅड.असिम सरोदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.रायगड जिल्ह्यातील सामाजिक बहिष्कारांच्या विविध घटना आणि दाखल गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा अमलात आणल्यावर, न्यायालयासमोर सुनावणी सुरू होणारा हा पहिला खटला आहे. कमळपाडा ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केले, या कारणावरून कमळपाडा गावकीने या ८० कुटुंबांना २००८ मध्ये वाळीत टाकले. तेव्हापासून गावातील कोणत्याही धार्मिक वा अन्य कार्यक्रमात या कुटुंबांना सहभागी करून घेतले जात नाही. आजतागायत हा सामाजिक बहिष्कार कायम आहे. अशी सामाजिक बहिष्काराची संपूर्ण पद्धती, वाळीतग्रस्त मधुकर ठाकूर यांनी शुक्रवारी न्यायालयात सरतपासणीच्या वेळी सांगितल्याचे अॅड.सरोदे यांनी सांगितले. याच दरम्यान आपल्याला धमक्यांचे फोन आले. त्याबाबत आपण पोयनाड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी याबाबत कोणत्याही प्रकारे तपास केला नाही, असेही मधुकर ठाकूर यांनी न्यायालयास सांगितल्यावर, न्यायालयाने या धमकीच्या फोनचा तपास करून, अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
धमक्यांच्या फोनचा तपास करून अहवाल सादर करा, न्यायालयाचे आदेश;कमळपाडा सामाजिक बहिष्कारप्रकरणी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:28 AM