अकोला : किडनी तस्करी प्रकरणामधील संशयित आरोपी विनोद पवार याच्या माध्यमातून शांताबाई खरात हिची किडनी विकत घेणाऱ्या नांदुरा येथील विजया झांबड, अभय झांबड व त्यांच्या मुलांचे जबाब पोलिसांनी गुरुवारी नोंदविले.पोलिसांनी बुधवारी विनोद पवारला स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतले. पवारने शांताबाई खरात, देवानंद कोलमकर आणि चावरे नामक व्यक्तीची किडनी विकल्याचे चौकशीत सांगितले. शांताबाईची किडनी नांदुरा येथील विजया झांबड यांना, तर देवानंदची किडनी नंदूरबार येथील शिक्षक नाईक याला विकण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी झांबड कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून, त्यांची चौकशी केली. तेव्हा विनोद पवार याला ते ओळखत नसल्याचे झांबड कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले.मुंबई, औरंगाबाद, पुणे येथील इस्पितळांमध्ये जाऊन पवार तोंडाला कापड बांधून फिरायचा. तेथे किडनी निकामी झालेले रुग्ण हेरून त्यांच्याशी सौदा करीत असे. देवेंद्र शिरसाट व आनंद जाधव यांच्या माध्यमातून किडनी विकण्यास तयार झालेल्या व्यक्तीची रुग्णालयांमध्ये तपासणी करून, सर्व अहवाल अनुकूल आले की, गरजू रुग्णांच्या शरीरात किडनीचे प्रत्यारोपण करीत असे, अशी माहिती खदान पोलिसांच्या तपासातून समोर आली. (प्रतिनिधी)
किडनी घेणाऱ्या कुटुंबाचे नोंदविले जबाब
By admin | Published: December 11, 2015 2:29 AM